चंद्रपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील कोसंबी गावात भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. यावेळी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार व काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांचे समर्थक आपसात भिडले, तर संतापलेल्या ग्रामस्थांनी रावत समर्थकांना चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचारतोफा थंडावल्या. मात्र, येरगाव व कोसंबी येथील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार कोसंबी गावात पोहोचले. तिथे त्यांनी जाहीर सभा न घेता ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. गावातील तलावाचे काम तसेच मंदिराचे बांधकाम सरपंचामुळे झाले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी मुनगंटीवार यांना या बैठकीत दिली. या गावाचे सरपंच काँग्रेसचे असून त्यांनी सुधीर मुनगंटीवार येथे जाहीर सभा घेत आहेत, अशी माहिती काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांना दिली. ही माहिती मिळताच संतोष रावत वाहनांचा ताफा घेऊन समर्थकांसह कोसंबी गावात दाखल झाले. बैठक सुरू असलेल्या ठिकाणी रावत आले व त्यांनी प्रचार संपला आहे, तुम्ही सभा घेऊ शकत नाही, असे मुनगंटीवार यांना सांगितले. यावर मुनगंटीवार यांनी मी सभा घेत नाही आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव गावात आलो आहे. त्याचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेत आहे, असे सांगितले. यावरही तुमचे समाधान होत नसेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार करा, असे सांगितले. अथवा माझी बैठक झाल्यानंतर तुम्ही बैठक घ्या व गावकऱ्यांशी बोला, अशी विनंती केली.

हेही वाचा >>>दिग्गज नेत्यांनी चंद्रपूरचे प्रचार मैदान गाजवले; ‘डॉली चायवाला’चा रोड शो

सुधीर मुनगंटीवार व संतोष रावत यांच्यात चर्चा सुरू असताना वातावरण तापले. यावेळी रावत यांचा वाहनचालक मोबाईलमधून व्हिडीओ चित्रीकरण करीत होता. त्यावर मुनगंटीवार व त्यांच्या सुरक्षारक्षकाने चित्रीकरण करण्याचा प्रकार योग्य नाही, असे म्हणत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. अशातच काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांचे समर्थक समोर आले. ते मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करत असताना सुरक्षारक्षकाने त्यांना अडविले. यानंतर भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला.

गावात शांततेत सुरू असलेली बैठक उधळून लावल्यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले. यावेळी ग्रामस्थ व महिलांनी रावत यांचा वाहनचालक, मूलचे माजी नगराध्यक्ष विजय चिंमड्याकवर तसेच इतर कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. या प्रकरणानंतर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत, पोलीस अधीक्षक गावात येऊन संपूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत गावातून जाणार नाही, असे जाहीर केले. पोलीस अधीक्षक आल्यानंतर मुनगंटीवार गावातून बाहेर पडले. दरम्यान रात्री उशिरा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मूल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. तसेच मुनगंटीवार यांच्या विरुद्ध आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी हा प्रकार शांततेने हाताळून कारवाईचे आश्वासन देत यावर पडदा टाकला.

हेही वाचा >>>प्रचार संपवून परत येताना कशी घडली घटना! अनिल देशमुखांवर हल्ला प्रकरणात काय म्हणतात पोलीस?

सुधीर मुनगंटीवार यांनी संतोष रावत यांना निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी तक्रार करण्याऐवजी गावात राडा केला, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. या प्रकारामुळे गावातील महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचे चित्र येथे बघायला मिळाले. या सर्व प्रकारात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यात त्यांचा चष्मा तुटला. दुसरीकडे, रावत समर्थक आचारसंहिता भंग हा एकच मुद्दा समोर करीत आहे. मात्र गावातील घडलेल्या प्रकाराचे काय, यावर बोलणे ते टाळत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly elections 2024 clash between bjp and congress workers in kosambi village of mula taluka rsj 74 amy