नागपूर: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २८८ जागांसाठी सुमारे ७,९९५ जणांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन प्रमुख आघाड्यांमधील सर्वच पक्षांमध्ये अनेकांनी बंडखोरी केली असून मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्थानिक आघाड्या, छोटे पक्ष हे देखील मैदानात उतरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून तत्पूर्वी नाराजांचे मन वळवण्याचे खडतर आव्हान नेतेमंडळींना पार पाडावे लागणार आहे. अशातच नागपूरमधील उमरेडचे आमदार असताना राजू पारवे यांना खासदार होण्याचे वेध लागले होते. काँग्रेससोडून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पराभूत झाल्यानंतर महायुतीमधील कुठल्याच पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे माजी आमदार पारवे यांची अवस्था बिकट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवख्या उमेदवाराने केला पारवेंचा पराभव

काँग्रेसच्या राजू पारवे यांनी २०१९च्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांना पराभूत केले होते. चार वर्ष त्यांचा काँग्रेससोबत सुखाचा संसार सुरू होता. लोकसभेची निवडणूक जवळ येताच त्यांची खासदार होण्याची इच्छा बळावली. भाजपने त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता.

हेही वाचा >>>धनत्रयोदशीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठे बदल; उच्चांकी दरामुळे..

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र मुख्ममंत्री शिंदे यांनी यास ठाम नकार दिला. शेवटी राजू पारवे यांना लोकसभेचे उमेदवार करावे, अशी अट भाजपने घातली. त्यानुसार पारवे शिंदे शिवसेनेत दाखल झाले. महायुतीचे ते उमेदवार होते. भाजपचे नेते आणि स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभेत त्यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता. मात्र नवख्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. 

हेही वाचा >>>प्रेमीयुगुलांकडून वसूली करणाऱ्या पोलिसांवरील गुन्हा रद्द, कारण काय? जाणून घ्या…

आमदारीची उमेदवारीही नाकारली

पारवे यांना आपल्याच उमरेड विधानसभा मतदारंसघात मताधिक्यसुद्धा घेता आले नाही. पारवे शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाल्याने उमरेड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. विधानसभेची तिकीट देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र भाजपने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच लोकसभेसाठी पारवे यांचे नाव पुढे  केले होते. ते तरी विचार करतील, अशी आशा पारवे यांना होती. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत भाजपने आपला येथे उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे राजू पारवे यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र भाजपने उमरेडचा उमेदवार जाहीर करताच राजू पारवे यांना धक्का बसला. भाजपने माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly elections 2024 legislature bjp raju parve nagpur dag 87 amy