लोकसत्ता टीम

वर्धा : आगामी विधानसभा निवडणुका युती, आघाडीसाठी परीक्षाच घेणार असल्याच्या घडामोडी आहेत. भाजप अधिक सेना तसेच काँग्रेस अधिक राष्ट्रवादी अशी मैत्री आजपर्यंत निवडणुकीस सामोरे गेली. आता मात्र दोघांना एक आणखी मित्र जुळला. लोकसभा निवडणुकीत तीन विरुद्ध तीन असा सामना झाला. मोठे क्षेत्र व ईच्छुक कमी असल्याने बरेचसे सामंजस्य जागा वाटपात दिसून आले होते. पण आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मूठभर जागा व लढणारे पायलीचे पन्नास, अशी गमतीदार टिपणी एका नेत्याने करीत भांडणे होणारच, अशी खात्री दिली.

दोघेच लढत असतांना निम्मे निम्मे वाटप सहज व्हायचे. त्यातून मग रिपाई व अन्य पक्षांना हे आपल्या कोट्यातून जागा देत. आता समान वाटा मागण्याचा दावा जोरजोरात होत आहे. त्याची सर्वाधिक धास्ती काँग्रेस आघाडीने घेतली आहे. आता ठाकरे सेना महाविकास आघाडीत आहे. लोकसभेप्रमाणे हिस्सा मिळणार की नाही, अशी दबक्या सुरात चर्चा होते.

आणखी वाचा-गडचिरोली : भोंगळ कारभार! पहिलाच पाऊस अन एक हजार कोटींचे रस्ते उखडले…

काँग्रेस व राष्ट्रवादीस गत निवडणुकीत लढलेल्या जागा आता मित्रासाठी सोडाव्या लागणार. मग काँग्रेसीची की राष्ट्रवादीची सुटणार, असे भय दिसून येते. पडलेल्या जागा कोण सोडणार व त्यावर कोण दावा करणार, असा पेच पुढे आल्याने काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, देवळी, हिंगणघाट या चारही जागा काँग्रेसच लढणार, असा निर्धार व्यक्त झाला. जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी चारही जागा लढण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनुसार झालेल्या या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे सर्व शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकसुरात सर्व जागा लढण्याचा आग्रह धरला. २५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान चारही विधानसभा क्षेत्रात मतदार नोंदणी तसेच निवडणूक आढावा घेतल्या जाणार आहे. एकही जागा मित्र पक्षास नं सोडण्याची ठाम भूमिका मांडण्यात आली. शेखर शेंडे, डॉ शिरीष गोडे, बाळा जगताप, सुधीर पांगुळ, सुरेश ठाकरे, धर्मापाल ताकसांडे यांनी मार्गदर्शन केले.

आणखी वाचा-नागपूर : ‘महाज्योती’चा ‘क्यूआर कोड’! तब्बल २ लाख विद्यार्थ्यांनी…

जिल्ह्यात राष्ट्रवादीने आर्वी व हिंगणघाट, तर ठाकरे सेनेने वर्धा व हिंगणघाट क्षेत्रवार जोरदार दावा केला आहे. पूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी हिंगणघाट तर उर्वरित तीन काँग्रेस लढण्याचे सूत्र अंमलात येत होते. आता ठाकरे सेनेचे काय ? हा प्रश्न पुढे आला आहे. जिद्दीला पेटलेल्या एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने चतकोर वाटा पण काँग्रेस सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले.