राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विदर्भाच्या प्रश्नावरून आज ( २९ डिसेंबर ) विधानपरिषदेमध्ये आक्रमक शैलीत भाषण करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. नितीन गडकरी सोडले तर विदर्भात आहे काय. तीनवेळा गोसेखुर्दचे उद्घाटन झाले, पण प्रकल्प काही समोर सरकत नव्हता. नितीन गडकरींच्या पुढाकराने प्रकल्प मार्गी लागला, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.
“विदर्भ वेगळा व्हावा ही भूमिका मनात का येते. वेगळा विदर्भ व्हावा ही कोणाचीही इच्छा नाही. विदर्भ महाराष्ट्रात रहावा ही बहुसंख्य लोकांची इच्छा आहे. पण, इच्छा निर्माण होण्यामागचं कारण, विदर्भावर होणारा सातत्याने अन्या. सर्व गोष्टी मुंबई, पुण्याकडे पाहिलं गेल्याने विदर्भ वेगळा राहिला. वेगळ्या विदर्भासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांनी लढा सुरु केला. आमच्या अन्याय झाला, बॅकलॉग राहिला, अशी मोठी भाषणे करण्यात आली,” असं खडसेंनी सांगितलं.
“विदर्भ वेगळा झाला पाहिजे, ही कठोर भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती. सरकारमध्ये आल्यावर वेगळ्या विदर्भाची भूमिका विसरलात. पाच वर्षे तुम्ही पूर्णवेळ मुख्यमंत्री होता. आता काही काळासाठी अर्धवेळ उपमुख्यमंत्री आहात. आता काहीतरी करा. नुसता सत्ता मिळवण्यासाठी वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी करायची. लोकांनी मारामाऱ्या करायच्या, मोर्चे, गोंधळ करायचं आणि तुम्ही नुसतं खुर्चीवर येऊन बसायचं. कोणत्या क्षेत्रात विदर्भाचा विकास झाला, याचं उत्तर हवं आहे,” असेही एकनाथ खडसेंनी म्हटलं.