बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा अहवाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती दिल्ली येथील राष्ट्रीय आजार नियंत्रण संस्थेच्या सहायक निर्देशक श्रीमती टांजन निकीड यांनी दिली.

केस गळतीसाठी घेण्यात आलेल्या विविध नमुन्यांचे विश्लेषण, अभ्यास, चाचण्या अजूनही सुरूच आहे. यामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अहवाल सादर झाला नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच या काळात केस गळतीचे रुग्ण वाढले नाही ही आरोग्य यंत्रणांची मोठी उपलब्धी असल्याचे त्या म्हणाल्या. यासाठी शरीरातील जड धातूचे जास्त प्रमाण कारणीभूत असू शकते असा प्राथमिक अंदाजही डॉक्टर निकीड यांनी वर्तविला आहे.

जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील १९ गावात मागील जानेवारी ते मार्चमहिन्या दरम्यान केस गळती व टक्कल चे रुग्ण आढळून आले होते. मार्च अखेर रुग्णसंख्या तीनशेच्या घरात गेली होती. अलीकडे चिखली व मेहकर तालुक्यात सहा रुग्ण आढळून आले.

त्यावर ठोस उपाययोजना झाली नसल्याने आता याच रुग्णांपैकी काही रुग्णांमध्ये नख गळतीचे प्रकार समोर आले आहेत. याची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अख्त्यारितील विविध संस्थांच्या तज्ञाचे नऊ सदसयीय पथक आज मंगळवारी, २२ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यात दखल झाले. प्रारंभी त्यांनी जिल्ह्यातील मेहकर येथे केंद्रीय आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्यमंत्री याच्या समवेत चर्चा केली यानंतर हे पथक शेगाव तालुक्यातील बोन्डगाव येथे दाखल झाले.

यावेळी पथक प्रमुख (टीम लीडर) टांजन निकीड यांनी प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘आयसीएमआर’ च्या अहवालाच्या दिरंगाई बद्धल, चार महिने लोटूनही अहवाल न मिळाल्याबदल विचारणा करण्यात आली . यावेळी त्यांनी वरील शब्दात संस्थेची बाजू मांडली. नमुन्यांचे विश्लेषण, पुथ:करण, चाचण्या यांना वेळ लागतो. अहवालाला वेळ लागण्याचे हेच कारण असल्याचे त्या म्हणाल्या. बाधित रुग्णाच्या शरीरात ‘हेवी मेटल’ चे प्रमाण वाढल्याने हा प्रकार होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

केंद्र आणि राज्य शासनाचे संयुक्त आरोग्य पथक ही शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावांमध्ये दाखल झाले आहेत.९ सदस्य असलेल्या पथकातील डॉक्टरांनी नखं गळणाऱ्या रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. शिवाय त्यांच्या घरी जाऊन ते काय खातात, पाणी कोणते पितात, याची संपूर्ण माहिती घेतली.

या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे त्वचारोग तज्ज्ञ, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र (हरियाणा), प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, गावोगावी जाऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेत आहे.

पथकांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. आवश्यक नमुने संकलित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते.