लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रार अर्जावर गैरअर्जदारावर गुन्हा दाखल न करणे आणि प्रकरण मिटवून देण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. परमानंद दादाराव कात्रे असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कवठा गावातील जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुनंदा ठाकरे यांनी केला होता. त्या जमिनीचा संयुक्त मालक असलेल्या गैरअर्जदाराने जमिनीच्या विक्रीपत्रात फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या संदर्भात सुनंदा ठाकरे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तो तक्रार अर्ज कोराडी ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे यांच्याकडे आला होता. त्यांनी त्यांच्या लेखनिकाला अर्ज निकाली काढण्यासाठी गैरअर्जदाराला पोलीस ठाण्यात बोलविण्यास सांगितले होते.

आठवडाभरापूर्वी तो युवक पोलीस ठाण्यात आला. सहायक निरीक्षक (एपीआय) प्रेमानंद कात्रे यांनी ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल न करणे आणि तपासात सहकार्य करणे तसेच गुन्हा दाखल करण्याऐजवी तक्रार करणाऱ्या सुनंदा ठाकरे यांचीच समजूत घालून तक्रार अर्ज मागे घेण्यास लावण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी एपीआय प्रेमानंद कात्रे यांनी केली. त्या युवकाने लाचेची रक्कम देण्यास नकार दिला. तसेच प्रकरण आपसातील असून आम्ही गावातच सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने सोडवितो, असे सांगितले. त्यामुळे एपीआय प्रेमानंद हे त्या युवकावर चिडले. त्याला गुन्हा दाखल करुन लगेच अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

कोराडी पोलीस ठाण्यातच अटक

सहायक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे हे कोराडी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहेत. त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार युवकाने एसीबी कार्यालयात तक्रार केली. बुधवारी दुपारी कोराडी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार युवकाकडून एपीआय प्रेमानंद कात्रे यांनी दोन लाख रुपये स्विकारताच एसीबीने त्यांना अटक केली. लाचेची रक्कम जप्त करुन कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एसीबीने एपीआय कात्रे यांना कोराडी पोलीस ठाण्याच्याच कोठडीत डांबले. त्यांच्या घरी झडीत घेऊन काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.