अकोला : एकाचवेळी सर्व ग्रह सूर्याच्या एका बाजूला आल्याने सर्व अवकाश प्रेमींच्या उत्साहात भर घालण्यासाठी येत्या १ फेब्रुवारीपासून चंद्र देखील साक्षीला राहणार आहे. सर्व ग्रहांचा परिचय करण्यात त्याची मदत होईल, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रात्री प्रमाणेच दिवसा सुद्धा आकाशात ग्रहतारे असतात. मात्र, प्रखर सूर्य प्रकाशात ते दिसत नाहीत. याला अपवाद शुक्र ग्रह आहे. सर्वात तेजस्वी शुक्र सध्या पृथ्वीच्या जवळ आणि सूर्यापासून दूर असल्याने तसेच चंद्र युतीमुळे या एकमेव ग्रहाचे दिवसा दर्शन शक्य होते. यासाठी दूपारी सावलीतून दक्षिण आकाशात वरच्या भागात आधी चंद्र व नंतर शूक्र दर्शन शक्य असेल. पृथ्वीचा उपग्रह चंद्र आयनिकवृत्त मार्गावरुन अर्थात राशी चक्रातून रोज १२ अंश अंतर सरकताना रोज नक्षत्र बदलतांना दिसतो, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

१ फेब्रुवारीला चंद्र पश्चिम आकाशात वलयांकित शनी ग्रहाच्या जवळ तर २ फेब्रुवारीला रविवारी सर्वात तेजस्वी शुक्र ग्रहाजवळ आणि ३ रोजी रेवती नक्षत्रात, ४ ला मेष राशीत अश्विनी जवळ असेल. ५ फेब्रुवारी रोजी चंद्र भरणी नक्षत्रात नेपच्यून ग्रहाजवळ तर ६ ला कृत्तिका नक्षत्र गुच्छाजवळ पाहता येईल. ७ फेब्रुवारी रोजी चंद्र त्याच्या आवडत्या रोहिणी नक्षत्रात, गुरु ग्रहाजवळ उत्तररात्रीपर्यंत बघता येईल. ८ ला चंद्र सर्व परिचित मृग नक्षत्रात पूर्वेस तर ९ ला संध्याकाळी लाल रंगाच्या मंगळ ग्रहाचे जवळ पुनर्वसु नक्षत्रात चंद्रा सोबत स्वर्गद्वारावर पाहता येईल. १ ला वृषभ राशीतील रोहिणी व गुरु ग्रह आणि शुक्र व नेपच्यून यांची युती, २ ला चंद्र पृथ्वीच्या जवळ, ९ ला बुध, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत व ११ रोजी बुध ग्रह कुंभ राशीत तर १२ ला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल, असे दोड म्हणाले.

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्राचे दर्शन

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्र फिरत्या चांदणीच्या स्वरूपात १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३९ ते ६.४३ या वेळी उत्तरेकडून पूर्वेस, २ फेब्रुवारीला रात्री ७.२६ ते ७.३१ या वेळी वायव्य ते दक्षिण आकाशात आणि ३ रोजी संध्याकाळी ६.३७ ते ६.४३ या वेळेस वायव्य ते आग्नेय दिशेला आकाश मध्यातून जातांना नुसत्या डोळ्यांनी चांगल्या प्रकारे पाहता येईल, असे देखील प्रभाकर दोड म्हणाले. सध्या स्थितीत सुनीता विल्यम्स त्या अवकाश केंद्रात आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astro lovers moon planets positions planets view ppd 88 ssb