नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर ‘महालक्ष्मी सरस’ या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत आयोजित राज्यस्तरीय लोकजागृती, महिला सक्षमीकरण प्रदर्शनात ‘तंत्रमंत्र’साठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय कार्यक्रमात चक्क भटजींना आमंत्रित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर राज्य शासनाकडून १६ फेब्रुवारीपासून नागपुरातील रेशीमबाग मैदानावर महिला बचत गटासाठी ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ आयोजित केले आहे. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, हा या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश आहे. मात्र, या शासकीय प्रदर्शनातील एका दालनात चक्क भविष्य सांगणारा आणि पूजाअर्चना करणारा भटजी बसविण्यात आला आहे.
प्रदर्शनात महिला-पुरुष आपला हात दाखवून भविष्य माहिती करून घेत आहे. भटजी मंत्र आणि तंत्राद्वारे लोकांना त्यांचे भविष्य सांगत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, भविष्य सांगितल्यानंतर दक्षिणासुद्धा मागितली जात असल्याची माहिती तेथील काही लोकांनी दिली.
महिला बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून राज्यस्तरावर, विभागस्तरावर आणि जिल्हास्तरावर या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत आहे. मग या शासकीय प्रदर्शनात ज्योतिष्य आणि भटजी यांचे काय काम, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे.