अकोला: पृथ्वीच्या पर्यावरणातील बदल लक्षात घेऊन यंदाच्या दिवाळी उत्सवात आकाशही सहभागी होत आहे. आकाश दिवाळीची पर्वणी लाभणार असून त्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.
अगदी रात्रीच्या प्रारंभी पूर्व क्षितिजावर गुरु ग्रह अत्यंत ठळक स्वरूपात दर्शन देत असून याच वेळी पश्चिम आकाशात बुध ग्रह चंद्रकोरीच्या जवळ युती स्वरूपात पाहता येत आहे. दक्षिण आकाशात वरच्या बाजूला शनी ग्रह सुद्धा कुंभ राशीत बघता येईल. पहाटे पूर्व क्षितिजावर शूक्र ग्रहाची तेजस्वी चांदणी आपल्या डोळ्यांना सुखद अनुभव देऊन जाईल.
हेही वाचा… दारूबंदी असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील दारू दुकानांमधून ३० टक्के दारू पुरवठा
सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा युरेनस ग्रह सध्या पृथ्वीच्या जवळ आल्याने त्याचे अत्यंत दुर्मीळ दर्शन सुलभ झाले. आकाशातील अभ्यास व संशोधन तसेच अंतराळवीरांचे प्रशिक्षण केंद्र अर्थात आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राचे सलग तीन दिवस दर्शन होत आहे. मंगळवारी संध्याकाळी ६.४६ ते ६.५१ यावेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस जातांना दिसले. १५ नोव्हेंबर रोजी ५.५७ ते ६.०४ यावेळी चंद्राजवळून प्रवास आरंभ करुन इशान्येकडे जातांना दर्शन होणार आहे. १७ ला पुन्हा संध्याकाळी ६ ते ६.०४ या वेळात पश्चिमेकडून उत्तर आकाशात बघता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
आकाशात रोषणाई
१६ व १७ च्या मध्यरात्री नंतर पूर्व आकाशातील सिंह राशी समुहातून उल्कांचा वर्षाव अनुभवता येईल. दरताशी सुमारे १५ते २० उल्का विविध रंगांची उधळण करीत आकाशातील दिवाळी साजरी करतील. पहाटेच्या सुमारास शूक्र ग्रहाच्या उपस्थितीत मृग नक्षत्राच्या खाली या अनोख्या आकाश नजाऱ्याचा आनंद अधिक प्रमाणात घेता येईल, अशी माहिती दोड यांनी दिली.