अकोला : चंद्राचे आकर्षण बाल वयापासून प्रत्येकाला असते.चंद्राच्या रोज बदलत्या कलांचे कुतूहल देखील लागून राहते. एकाच वेळी आकाशात चक्क सात चंद्राचे दर्शन होणार, असे आपल्याला सांगितल्यास विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे असून तसा दावा खगोल अभ्यासकांनी केला आहे. येत्या २ मार्चपासून सलग १५ दिवस पश्चिम आकाशात एक साथ सात चंद्र बघता येणार आहेत. यामध्ये एक चंद्र, दुसरा शुक्राची कोर आणि तिसरा बुध ग्रहाच्या कलेचा आकार चंद्राप्रमाणे पाहता येईल.
सोबतच सध्या वृषभ राशीतील गुरु ग्रह व त्याच्या एकूण ९५ चंद्रापैकी गनिमीड, आय.ओ, युरोपा आणि कॅलिस्टो या चार मोठ्या चंद्राचे दर्शन दुर्बिणीतून चांगल्या प्रकारे घेता येणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी आज दिली.प्रथम चंद्र, नंतर पश्चिम आकाशात विलोभनीय दर्शन देणारा सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह सद्यस्थितीत सहज लक्ष वेधून घेत आहे. या ग्रहाचे दुर्बिणीतून दर्शन केल्यास चक्क आपल्याला चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे शुक्र ग्रहाची कोर आणि बुध ग्रह दशमीच्या चंद्र कलेप्रमाणे दिसत आहे. बुध ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने या ग्रहाचे दर्शन क्षितिजापासून कमी अंतरावर असल्यामुळे हा ग्रह फार कमी वेळ दर्शनासाठी उपलब्ध असतो, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
बुध व शुक्र ग्रह सध्या पश्चिम आकाशात मीन राशीत असून २ मार्चला शुक्र आणि १५ मार्चपासून बुध ग्रह वक्री होत आहेत. अर्थात हे दोन्ही ग्रह उलट फिरत असल्याचा भास होईल. विशेष म्हणजे १९ मार्चला बुध आणि शुक्र ग्रहाचा एकाच दिवशी पश्चिमेस अस्त होईल. त्यानंतर २६ मार्चपासून शुक्र आणि बुध ग्रह १ एप्रिलपासून पहाटे पूर्व क्षितिजावर दिसायला लागेल. मध्यंतरी २ मार्चला चंद्र शुक्रासोबत व ६ मार्चला गुरु ग्रहाचे जवळ आणि ९ रोजी चंद्र मंगळ ग्रह युती बघता येईल.
११ मार्च रोजी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह युती स्वरूपात एकमेकांच्या अगदी जवळ असतील. अवकाश प्रेमींसाठी ही एक अत्यंत दुर्मीळ संधी असून त्यांना आगळावेगळा अनुभव घेता येणार आहे. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.