अमरावती : आठवडाभर सूर्याच्या एका बाजूला सर्व ग्रह येत असल्याने दिवसा आकाशात केवळ सूर्य तर रात्री सर्व ग्रह मंडळी एकत्र दर्शनास येत आहेत. आकाशातील बारा राशी पैकी सलग येणाऱ्या कर्क ते धनू या सहा राशी एकदम खाली आहेत. रात्रीच्या प्रारंभापासून पहाटेपर्यंत ग्रह दर्शनाचा लाभ आठवडाभर घेता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सद्यःस्थितीत पश्चिमेची शोभा वाढवणारा शुक्र व शनी हे दोन्ही एकमेकांजवळ कुंभ राशीत तर सर्वात मोठा गुरु ग्रह, लालसर रंगाचा मंगळ ग्रह आणि सध्या पृथ्वीच्या जवळ आलेले नागरिकांना पाहता येतील. सोबत युरेनस, नेपच्यून दुर्बिणीतून बघता येतील. या कालावधीत दिवसा आकाशात फक्त सूर्य आणि बाकी ग्रह रात्रीचे आकाशात असतील, असे खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी सांगितले.

कृष्ण पक्षातील हा अनोखा आकाश नजारा अतिशय दुर्मिळ व डोळ्यांचे पारणे फिटेल, असा आहे. आकाशातील ग्रह ताऱ्यांचा नजारा प्रत्येक मानवी जीवाला भुरळ पाडून जातो. अशातच एखादी अनोखी घटना खूप आकर्षक आणि दीर्घकाळ स्मरणात राहते. दिवसा फक्त सूर्य आणि रात्री सर्व ग्रह अन् तेही रात्रीच्या प्रारंभी व कृष्ण पक्षातील अंधाऱ्या वेळी हा अनोखा आकाश नजारा खूपच सुंदर व मनोवेधक आहे. सूर्यमालेतील सर्व ग्रह स्वतःभोवती फिरत सूर्य प्रदक्षिणा करताना आकाशात आयनिकवृत्त मार्गावरून फिरतात. यालाच राशीचक्र म्हणतात.

आपली पृथ्वी स्वतःभोवती पश्चिम-पूर्व फिरल्याने येणाऱ्या ३० अंशांच्या भागात दिसणाऱ्या तारकांच्या कल्पक आकारांवरून मेष ते मीन अशी बारा राशीची रचना प्रत्यक्ष आकाशात पाहता येते. प्रत्येक ग्रहाचा परिवलन व परिभ्रमण कालावधी वेगवेगळा असल्याने हा सर्व परिवार राशीकात वेगवेगळ्या ठिकाणी असतो. कोणताही ग्रह जेव्हा सूर्य सान्निध्यात येतो. तेव्हा संबंधित ग्रहाचे दर्शन होत नाही यालाच ग्रह अस्त झाला असे समजतात. बुध आणि शुक्र या दोन अंतराळाचे उदयास्त पूर्व किंवा पश्चिमेस होतात. बाकी ग्रह मात्र पूर्वेला उगवून पश्चिमेस मावळतात. सध्या आकाशात गुरू, मंगळ, शुक व शनी ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत आहे. सायंकाळी पूर्व क्षितीजावर आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू दिसत आहे. त्याच्याजवळ लाल रंगाचा मंगळ दिसत आहे. तसेच पश्चिम क्षितीजावर शुक्र ग्रह दिसत आहे. त्या ग्रहाजवळ शनी ग्रह दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astronomical events in the sky six planets parade in the night sky when and where to watch mma 73 zws