नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन मोठ्या थाटामाटात देशाची राजधानी दिल्लीत झाले. अगदी उदघाटनपर भाषणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली. मात्र, आयोजक कदाचित हे मराठी साहित्य संमेलन आहेत हे विसरले की काय अशी शंका आली. देशाच्या राजधानीत मराठीवर प्रेम करणारी मंडळी मराठी भाषेसाठी, मराठीवरील त्यांच्या प्रेमासाठी एकत्र आली असताना व्यासपीठावरील पाहुण्यांच्या नावाच्या पाट्या मात्र चक्क इंग्रजीत होत्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजकांनी “एबीएमएसएस” असे नामकरण देखील करून टाकले.

९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठमोळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला खरा, पण इंग्रजीचा पगडा अजूनही आपल्यावर कायम असल्याचे या संमेलनात दिसून आले. एक तर उदघाटन बंद सभागृहात करण्यात आले, जे आजवरच्या साहित्य संमेलनात कदाचित पहिल्यांदाच झाले असावे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव एकदाचे तेही मान्य केले, पण मग मान्यवर आमंत्रितांच्या नावांच्या पाट्यांचे काय ? संमेलन मराठी भाषेतील साहित्याचे आणि व्यासपीठावरील आमंत्रितांच्या नावाच्या पाट्या चक्क इंग्रजीत लिहिलेल्या होत्या. त्यातही कहर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संक्षिप्त स्वरूप चक्क “एबीएमएसएस” असे करण्यात आले. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाताच माय मराठीची आयोजकांनी केलेली ही अवस्था पाहून माय मराठीवरील त्यांच्या प्रेमावर शंका उपस्थित करणारे होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाताच इंग्रजी भाषेत सन्माननीय आमंत्रितांच्या नावाच्या पाट्या मराठीतून नाही तर इंग्रजीतून लिहून माय मराठीचा सन्मान नाही तर अवमान करण्यात आला. या प्रकारामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “माय मराठी”चा सन्मान असायला नको का असाच प्रश्न “माय मराठी” वर प्रेम करणाऱ्यांनी उपस्थित केला. जिथे

सतत जीव धोक्यात असतो अशा काश्मीरमध्ये राहणारी शमीमा अख्तर ही काश्मिरी मुलगी अस्खलित मराठीतून पसायदान सादर करते तेव्हा उर अभिमानाने भरून येतो. पण त्याच साहित्य संमेलनात मान्यवरांपासून तर निमंत्रितांपर्यंत आशा सगळ्यांच्या नावाच्या पाट्या मात्र इंग्रजीतून असतात. या संमेलनात येणार रसिक, श्रोता, पाहुणा मराठीचा जाणकार नक्कीच आहे. नावाच्या पाट्या मराठीतून लिहिल्या तर कळणार नाही, इतका तो अमराठी नक्कीच नाही. मात्र, आयोजकांना कदाचित “माय मराठी” वर विश्वास नाही आणि म्हणूनच मराठमोळ्या वातावरणात त्यांनी इंग्रजीचे “लेबल” चिपकवलेच.

Story img Loader