चंद्रपूर: उमेदवाराची गोपनीय पसंती नोंदविण्यासाठी राजुरा येथे बोलविलेल्या भाजपाच्या बैठकीत पक्ष निरीक्षकासमोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या प्रकारामुळे राजुरा विधानसभेत भाजपातील अंतर्गत गटबाजी समोर आली.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने गोपनीय पसंती हा नवा उपक्रम सुरू केलेला आहे. यासाठी राजुरा येथे पटवारी सभागृहात पक्ष निरीक्षक डॉ.राजीव पोद्दार यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला मंडळ पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, बाजार समिती, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांना निमंत्रित केले होते. यावेळी इच्छुक उमेदवार देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे उपस्थित होते. बंद लिफ्यात एक ते तीन उमेदवारांची नावे पसंती क्रमानुसार निरीक्षकांकडे द्यायची होती. तत्पूर्वी पसंती क्रमांक देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे काहींनी निरीक्षकांना मागितली आणि तिथून गोंधळाची सुरूवात झाली.

हे ही वाचा…Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

निरीक्षकांच्या यादीत तब्बल ३५० नावे होती.एवढ्या मोठ्या संख्येत अभिप्राय नोंदविण्यांसाठी नावे समोर आल्याने निमकर, बोंडे आणि माजी आमदार संजय धोटे समर्थक चक्रावले. स्वतः खुशाल बोंडे यांनी यावर आक्षेप घेतला. अभिप्राय नोंदविणाऱ्यांची संख्या ८० ते शंभरच्या घरात असेल, अशी अपेक्षा या लोकांची होती. तिथूनच संशयाचे आणि तणावाचे धुके दाटायला सुरुवात झाली. राजुरा विधानसभेत चार मंडळ आहे. राजुरा नगर परिषदेचे एक वेगळे मंडळ असे एकूण पाच मंडळ आहे. या मंडळाच्या कार्यकारणी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. त्या करताना या मतदार संघातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले नाही .काही नावे बोगस टाकण्यात आली, असा आरोप धोटे, निमकर आणि बोंढे समर्थकांनी केला आणि यादीवर आक्षेप नोंदविला आणि गोंधळाला सुरूवात झाली. यावेळी इच्छुकांच्या समर्थकांत शाब्दिक चकमक उडाली.

हे ही वाचा…Petrol & Diesel Price : महिन्याच्या तिसऱ्या दिवशी पुण्यात वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?

त्यामुळे सभागृहात तणावाचे वातारवण निर्माण झाले. हा सारा गोंधळ डॅा. पोद्दार बघत होते. कार्यकारिणीच बोगस आहे, असे डॅा. पोद्दार यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्नही काहींनी केला. मात्र साऱ्या गोंधळात बंद लिफ्याचा खेळ सुरु राहिला. त्यामुळे इच्छुकांचे समर्थक आणखी संतापले. ज्येष्ठा पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने धक्काबुक्की टळली. दरम्यान पसंती बैठकीतच इच्छुक उमेदवारांचे समर्थक एकमेकांच्या विरोधात उठल्याने भाजपातील गटबाजी उघड झाली.