यवतमाळ : महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी कारवाईत दुजाभाव करत असल्याचा राग मनात धरून वाळू तस्कारांनी तलाठ्यासह कोतवालावर हल्ला चढवला ही घटना दिग्रस तालुक्यातील गांधीनगर येथे घडली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांत प्रसारित झाली असून, महसूल विभागात या घटनेने खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून काही रेती तस्करांना खुली सुट तर काही रेती तस्करांवर कठोर कारवाईच्या झाल्याने दिग्रस रोडवरील गांधीनगर येथे तलाठी व रेती तस्करात चांगलाच राडा झाला. दिग्रस-दारव्हा मार्गावरील गांधीनगरजवळ अरुणावती नदी आहे. या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असून ट्रॅक्टर तसेच छोट्या वाहनांमधून राजरोसपणे  रेती चोरी सुरू आहे. या साज्यातील तलाठी व कोतवाल गस्तीवर असताना रेती चोरट्यांत व त्यांच्यात  वादावादी झाली. रेतीने भरलेले दुसरे ट्रॅक्टर का सोडले आणि माझीच गाडी का पकडली? सर्वांना समान न्याय देऊन गाडी सोडा. एकाची  गाडी पकडायची, दंड करायचा आणि दुसऱ्याला मात्र सूट द्यायची हा कुठला न्याय? असे म्हणत हा वाद  रंगला. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन महसूल कर्मचाऱ्यांना रेती तस्करांनी जबर मारहाण केली. ही चित्रफीत आता समाज माध्यमांत प्रसारित झाली आहे.

मस्तवाल वाळू तस्करांचा तलाठी, कोतवालावर हल्ला….चित्रफितीत जे दिसतेय….

हेही वाचा >>>‘‘महायुती सरकारला महाराष्ट्रातून हाकलून लावणे हेच आमचे ध्येय,” नाना पटोले यांचे मत; म्हणाले…

ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे साज्यातील तलाठी जयंत प्रकाश व्यवहारे यांनी दिग्रस पोलिसांत संबंधित घटनेची लेखी तक्रार दिली. त्यावरून दिग्रस पोलिसांनी आरोपी शेख मतील शेख मोबीन (५०), लकी मतीन शेख (३०), गोलू मतीन शेख (२३) रा. आंबेडकर नगर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.

हेही वाचा >>>…तर चामुंडी कंपनीत स्फोट झालाच नसता, व्यवस्थापनाचे कुठे चुकले? वाचा…

या घटनेने गेल्यावर्षी उमरखेड तालुक्यातील हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. उमरखेड येथे वाळू तस्कारांनी गस्तीवर असलेल्या महसूल अधिकाऱ्यावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले होते.   घाटंजी येथे एका महसूल अधिकाऱ्याचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वाळू तस्कर आणि महसूल अधिकाऱ्यांत सातत्याने वादाच्या घटना घडत असून, महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढल्याने वाळू तस्करांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी केली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने वाळू तस्कर मुजोर झाल्याने प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At gandhinagar in digras taluka sand smugglers attacked the kotwal along with talathi yavatmal nrp 78 amy