नागपूर : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ज्वाला नावाच्या नामिबियन चित्त्याने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. नामिबियन चित्ता आशाने तिच्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर काही आठवड्यांनंतर हे घडले आहे. चित्ता प्रकल्पाच्या यशस्वीतेवर बोट उचलले जात असताना या दोन घटनांमुळे पुन्हा एकदा हा प्रकल्प यशस्वीतेकडे वाटचाल करताना दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आशा या मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला होता. मार्च २०२३ मध्ये मादी चित्ता ‘ज्वाला’ने चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यातील केवळ एकच बछडा आता जिवंत आहे. चित्ता प्रकल्पाअंतर्गत भारतात नामिबिया येथून १७ सप्टेंबर २०२२ला आठ, तर दक्षिण आफ्रिकेतून १८ फेब्रुवारी २०२३ला १२ चित्ते आणले होते. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांना सोडण्यात आले. त्यापैकी नामिबियातील मादी चित्ता ‘ज्वाला’ने २४ मार्च २०२३ला चार बछड्यांना जन्म दिला. यातील तीन बछड्यांचा अवघ्या दोन महिन्यात मृत्यू झाला. २३ मे रोजी एक तर २५ मे रोजी दोन बछडे मृत्युमुखी पडले. तसेच सहा चित्त्यांचा देखील मृत्यू झाला. यानंतर या प्रकल्पावर टिकेची बरीच झोड उठली. यातील काही चित्ते जंगलात सोडण्याचा प्रयत्न झाला, पण या चित्त्यांनी कुनोची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना परत आणण्यात आले.

हेही वाचा : अधिवास क्षेत्रासाठी झुंज, ताडोबात दोन वाघांचा मृत्यू; वनविभागात खळबळ

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नामिबियन चित्ता ‘आशा’ने तीन बछड्यांना जन्म दिल्यामुळे या प्रकल्पाकडे पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने पाहीले जात आहे. तर आता पाठोपाठ ज्वालाने देखील तीन बछड्यांना जन्म दिल्यामुळे हा प्रकल्प योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील कुनोत जन्मलेल्या या तीन बछड्यांचे स्वागत केले आहे. चित्ता प्रकल्पाचे हे यश असल्याचे त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर सांगितले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At kuno national park namibian cheetah jwala gives birth to three cubs rgc 76 css