यवतमाळ : तारुण्यात एक लग्न झाले असताना निवृत्तीनंतर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणे अनेकांसाठी अडचणीचे ठरू शकते. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एक, दोन नव्हे तर तब्बल १४ जोडपी निवृत्तीचे आयुष्य जगत असताना लग्नबंधनात अडकली. विशेष म्हणजे, या सर्वांनी आपले मुलं, मुली, सुना, जावई आणि नातवंडांच्या उपस्थितीत सामूहिक विवाह मेळाव्यात आपल्या जोडीदाराच्या गळ्यात हार टाकला. महागावात झालेल्या या सामूहिक मेळाव्यातील लग्नाची गोष्ट सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
विवाहबंधनात अडकलेली ही सर्व जोडपी आपल्या पहिल्याच जोडीदारासोबत दुसऱ्यांदा चतुर्भूज झाली, हे महत्वाचे. उमरखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील १९७७ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या या मित्रांनी हा अनोखा स्नेहमिलन सोहळा २९ डिसेंबर रोजी महागाव येथील मोटरवार मंगल कार्यालयात घेतला. १९७७ मध्ये दहावी झाल्यानंतर सर्व मित्र विखुरले. विविध क्षेत्रात भरारी घेतली. घर, संसार, जबाबदाऱ्या सुरू झाल्या, तशा मित्रांच्या गाठीभेटी कमी झाल्या. पुढे त्या बंदच झाल्या. २०२३ मध्ये काही मित्रांनी पुढाकार घेवून १९७७ च्या बॅचचे कौटुंबिक स्नेहमिलन आयोजित केले. दरवर्षी एका मित्राने पुढाकार घेवून असे ‘गेट टू गेदर’ आयोजित करण्याचे ठरले. २०२४ मध्ये २९ डिसेंबर रोजी हा स्नेहमिलन सोहळा महागाव येथे घेण्याचे डॉ. संतोष मोटरवार यांनी जाहीर केले. हा स्नेहमिलन सोहळा हटके असावा यासाठी मोटरवार दाम्पत्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातूनच सर्व मित्रांचा त्यांच्या सहचारिणीसोबत दुसऱ्यांदा विवाह लावून देण्याची कल्पना सुचली आणि या विवाह सोहळ्याची लगबग महागाव येथे सुरू झाली.
हेही वाचा – अकोला : स्वयंसेवी संस्थांसाठी महत्त्वाचे! ‘धर्मादाय’ संकेतस्थळाच्या संथगतीचा…
या सोहळ्यात स्वतः विवाह बंधनात अडकणारे असूनही डॉ. संतोष मोटरवार व त्यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी वधू पक्षाची भूमिका स्वीकारली. रविवार, २९ डिसेंबरला सकाळी सर्व मित्र आपल्या कुटुंबीयांसह कार्यक्रमस्थळी पोहचले तेव्हा सर्व वऱ्हाड्यांचे परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात आले. दिवसभर विवाहपूर्व विधी पार पडले. सायंकाळी बँड, डिजे लावून सर्वांची मिरवणूक काढून फटाके फोडण्यात आले. गोरज मुहूर्तावर सनई चौघड्याचा सुर उमटू लागला. हॉलमध्ये १०० फुटांचा अंतरपाट धरण्यात आला. या सामूहिक विवाह मेळाव्यात पारंपरिक मंगलाष्टके म्हणत १४ जोडप्यांचा पुनर्विवाह झाला. सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या जोडीदाराच्या गळ्यात विवाहमाला टाकल्या. तेव्हा वऱ्हाडी म्हणून उपस्थित असलेले या जोडप्यांचे मुलं, मुली, सुना, जावई, नातवंडं आपल्या आई – वडिलांचा, सासू – सासऱ्यांचा, आजी – आजोबांचा हा विवाह सोहळा बघून भारावून गेले होते.
या विवाह सोहळ्याला या विद्यार्थ्यांना त्यावेळी शिकवत असलेले व आता वयाच्या नव्वदीत असलेले काही शिक्षकही उपस्थित होते. उपस्थितांनी विवाहानंतर पुनर्विवाहित जोडप्यांना भेटवस्तू देवून स्वागतही केले. लग्नानंतर उपस्थित वऱ्हाड्यांना पंचपक्वानांची पंगतही देण्यात आली. रात्री, ‘बाबुल की दुवाये लेती जा’ या खास गीताच्या सुरात पुनर्विवाहित दाम्पत्याची घराकडे पाठवणी करण्यात आली.
हेही वाचा – गोंदिया : रेल्वेचे नवे वेळापत्रक, १ जानेवारीपासून काय बदल होणार?
यांनी घेतली विवाहाची दुसऱ्यांदा अनुभूती
या विवाह सोहळ्यात मीनाक्षी-डॉ.संतोष राजाभाऊ मोटरवार, मंगल-डॉ.संजय श्रीनिवास तेला, उषा-डॉ.दिलीपकुमार रामेश्वर शिवाल, भावना-बालाजी बाबूराव उदावंत, तेजश्री- अॅड. संतोष पद्माजी जैन, संध्या- अॅड. नारायण गोविंद इंगळे, जयश्री -सुभाष गोविंदराव काळे, माधवी-मनोज शरद देशपांडे, सुनंदा-विनायक बळवंत साकारकर, सुषमा-मिलिंद रमाकांत महामुने, गंगा-सुरेश राजाराम माकू, सुनीता-विजय मारोतराव सोनूने, कल्पना-उज्वल माणिकचंद रोकडे, कल्पना-दत्तराव मारोतराव पानपट्टे या जोडप्यांनी दुसऱ्यांदा विवाहाची अनुभूती घेतली.