नागपूर : गर्भवती पत्नीला भेटून घरी परतणाऱ्या व्यावसायिकाच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वैभव हर्षवर्धन मानेकर (२८, मॉडर्न टाऊन, पांजरा, भिलगाव) असे मृतकाचे नाव आहे. वैभव व्यावसायिक होता व त्याची पत्नी चार महिन्यांची गर्भवती असल्याने माहेरी गेली होती. पत्नी बेझनबाग येथे राहत असल्याने तो बुधवारी रात्री आठ वाजता तिला भेटण्यासाठी गेला. जाताना तो वडिल डॉ. हर्षवर्धन यांची (एमएच ०१ बीवाय ५७६४) ही कार घेऊन गेला. रात्री दोन वाजताच्या सुमारास तो पत्नीला भेटून निघाला.
कामठी मार्गाने घराकडे परतत असताना उप्पलवाडी रेल्वे पुलाजवळ त्याचे कारवरील संतूलन बिघडले व कारने रस्ता दुभाजकाला धडक दिली. वेग जास्त असल्याने कार पलटली व ड्रायव्हर सीटजवळ वैभव दबला. घटनास्थळावरील लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी उपचारासाठी वैभवला मेयो रग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार भरधाव वेगात होती व त्यामुळेच ती पलटली. त्याचे वडील हर्षवर्धन यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.