देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ हे विद्यापीठ गीत सामूहिकपणे गायले जाते.
मात्र, नुकत्याच झालेल्या शताब्दी महोत्सवामध्ये उपराष्ट्रपतींच्या राजशिष्टाचाराचे कारण देत हे गीत कार्यक्रमातून वगळण्यात आले. हा प्रकार म्हणजे, राष्ट्रसतांची उपेक्षा असल्याचा आरोप करीत राष्ट्रसंतांचे अनुयायी आणि शैक्षणिक वर्तुळातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा… सायबर गुन्हेगाराकडून काँग्रेस नेत्याची फसवणूक; पोलिस निरीक्षकाच्या नावाने फेसबूकवर बनावट खाते
गौरवशाली शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव ४ ऑगस्टला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला. परंतु, या ऐतिहासिक सोहळ्यात विद्यापीठ गीताला डावलण्यात आले. याच सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रसिद्ध भजन ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव। देव अशानं भेटायचा नाही रे…’चा उल्लेख आपल्या भाषणात सन्मानपूर्वक केला.
हेही वाचा… नागपूर: मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने केली वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण
मग विद्यापीठ गीतालाच उपराष्ट्रपतींच्या राजशिष्टाचाराची अडचण कशी झाली, असा प्रश्न श्रीगुरुदेव युवामंचचे प्रवर्तक आणि विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यास मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर रक्षक यांनी केला आहे. हा राष्ट्रसंतांचा अवमान असल्याचा आरोपही केला जात आहे. यासंदर्भात विद्यापीठाला विचारणा केली असता, शताब्दी महोत्सवाच्या प्रत्येक मिनिटांचे नियोजन उपराष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आले होते. या नियोजनात विद्यापीठ गीत समाविष्ट करावे, अशी अनेकदा विनंती करण्यात आली. मात्र, ती नाकारण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
विद्यापीठ गीताचा इतिहास…
४ मे २००५ ला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विधानसभेत विद्यापीठ नामविस्ताराची घोषणा केली. नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर’ असा झाला. त्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या कार्यकाळात ‘या भारतात बधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे’ हे विद्यापीठगीत म्हणून स्वीकारण्यात आले. तेव्हापासून विद्यापीठातील प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात या गीताने होते. विद्यापीठात श्रीगुरुदेव युवामंचाच्या सततच्या मागणीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन २०११ मध्ये आणि एम. ए. राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा २०१५ मध्ये सुरू झाले. असे असतानाही उपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमात केवळ राजशिष्टाचाराचे कारण देत विद्यापीठ गीत नाकारल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठाच्या ऐतिहासिक सोहळ्यात विद्यापीठ गीत नाकारणे हा विद्यापीठाचा तर अपमान आहेच. पण राष्ट्रसंतांच्या विचाराचांही अपमान आहे. – ज्ञानेश्वर रक्षक, प्रवर्तक, श्रीगुरुदेव युवामंच.