गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप करून नक्षलवाद्यांनी गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. २३ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ही थरारक घटना घडली. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी तेथे पत्रक टाकले असून त्यात गाव पाटलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलीस तसेच स्थानिक नेत्यांवर आरोप केले आहेत. लालसू वेलदा (६३, रा. टिटोळा ता. एटापल्ली) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे.

हेडरी पोलीस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोळा गावात हा थरार घडला. गाव पाटील लालसू वेलदा हे स्वत:च्या घरी होते. रात्री ९ वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले. लालसू यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबासमोरच हा थरार घडला. दरम्यान, या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जि.प. सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे. हत्येनंतर घटनास्थळी पत्रक आढळले. त्यात सुरजागड लोह खाणीचे समर्थन व पोलिसांसाठी काम करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजन कमेटीने केला आहे. यासाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. लालसू यांचा मुलगा पोलीस दलात कार्यरत आहे.

हेही वाचा – बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम, ‘हॅमुन’ नावाने ओळखले जाते हे चक्रीवादळ

खाण समर्थकांना टोकाचा इशारा

आदिवासी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी हक्काची लढाई लढत आहेत तर हा आवाज दाबण्यासाठी काही लोक जनविरोधी काम करत आहेत. लवकर सुधरा अन्यथा जनता कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत खाण समर्थकांना नक्षल्यांनी पत्रकातून इशारा दिला आहे.

हेही वाचा – नागपूर : सुरक्षारक्षकाचा मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

एटापल्लीच्या हेडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाव पाटलाच्या हत्येची घटना घडली आहे. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मारेकऱ्यांच्या मागावर पथके रवाना केली आहेत. योग्य तो तपास करण्यात येईल. – नीलोत्पल पोलीस अधीक्षक, गडचिरोली

Story img Loader