वर्धा : मंदिराच्या दानपेटीत भक्त मंडळीकडून देणगी स्वरूपात नोटा, दागिने, नाणी टाकल्या जात असतात. मात्र त्यात पेटती अगरबत्ती टाकणारा वेडसरच म्हटला पाहिजे. झालेही तसेच. पुरणपोळीच्या नैवेद्यासाठी सर्वत्र प्रसिद्धीस आलेल्या हिंगणघाट तालुक्यातील आजानसरा हे तीर्थक्षेत्र आहे. संत भोजाजी महाराज यांचे देवस्थान असलेल्या या मंदिरात आठ दानपेट्या आहेत. त्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे सील लावून ठेवण्यात आले आहे. दर महिन्यास आयुक्त कार्यालयातील अधिकारी तसेच देवस्थानाचे विश्वस्त यांच्या देखरेखित दानपेटी उघडून रक्कम मोजल्या जाते. नंतर ती देवस्थानचे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत जमा केल्या जाते.

मंदिरात नेहमीच भाविकांची मोट्या प्रमाणात गर्दी असते. त्याचाच आडोसा घेत गावातीलच रहिवासी असलेल्या सुरेश कचोळे याने पेटीत जळती अगरबत्ती टाकली. त्यामुळे मोठी रक्कम जळाली. नेमका आकडा पुढे आला नाही. त्याची माहिती धर्मादाय आयुक्त तसेच वडनेर पोलिसांना देण्यात आली आहे. सदर इसम हा मनोरुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस याप्रकरणी  अधिक चौकशी करीत आहे. मात्र या घटनेने  भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Story img Loader