नागपूर : इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुढील वर्गात जाण्यास अडचण येते, त्यांच्यासाठी आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये जसा एटिकेटीचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो, तसाच प्रकार आता अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश घेता येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

दहावीच्या वर्गात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऐटीकेटीच्या माध्यमातून अकरावीला प्रवेश मिळतो. याच धर्तीवर आता अभियांत्रिकीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील नापास झाल्यानंतरही पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. त्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आदेश सोमवारी काढला आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेताना जर एखाद्या विद्यार्थ्याचा पहिल्या वर्षाचे विषय राहिले तर त्याला तृतीय वर्षाला प्रवेश मिळत नाही. तीनपेक्षा जास्त विषय (थेअरी व प्रॅक्टिकल) हेडमध्ये तो विद्यार्थी अनुत्तीर्ण नसावा, अशी अट आहे. तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यास पहिल्या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण व्हावे लागतील. अंतिम वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम व द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विषयांत त्यांना पास व्हावे लागणार आहे.

दरम्यान, करोनानंतर विद्यार्थ्यांची अभ्यासाची गोडी कमी होऊन सहज पास होण्याची सवय लागल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाला असा निर्णय घ्यावा लागल्याची टीका शिक्षणतज्ज्ञांकडून होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांनी कॅरिऑन या पर्यायाचा विचार न करता अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून पुढे चांगली नोकरी, रोजगाराची संधी त्यांना मिळेल, असे आवाहन देखील केले जात आहे.

शैक्षणिक वर्ष वाचणार

नव्या निर्णयानुसार, प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रासाठी, तर द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्रात प्रवेश घेता येईल. म्हणजेच, तीन किंवा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील या निर्णयाचा फायदा होईल. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार आहे. यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचा मार्ग सुकर होईल आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अडचणींवर मात करण्याचा मार्ग मिळेल. शिक्षण क्षेत्रातील हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याला अधिक उंचावण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यांच्या करिअरच्या संधी वाढवण्यास सहाय्यक ठरेल.

Story img Loader