अमरावती : अमरावती विमानतळावर रविवारी प्रथमच एटीआर-७२ चाचणी विमान यशस्वीरीत्या उतरले. यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या विमानतळ विकासाच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) – उडान अंतर्गत व्यावसायिक विमान सेवेसाठी या विमानतळाची पूर्ण तयारी असल्याचे दाखवणारे हे विशेष चाचणी विमान इंदूरहून अमरावतीला आले.
रविवारी दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांनी एटीआर-७२ विमानाने अमरावती विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हँडलिंग क्षमतांची तपासणी या निमित्ताने झाली. यानंतर अवघ्या काही मिनिटांत, ४ वाजून १७ मिनिटांवर विमानाने पुन्हा इंदूरसाठी उड्डाण घेतले.
अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त आता जवळ आला आहे. हे विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) तर्फे उडान योजनेअंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरणार आहे, असे सांगताना एमएडीसीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, एमएडीसीने पुन्हा एकदा अशक्य शक्य करून दाखवले आहे. हा मैलाचा दगड म्हणजे महाराष्ट्रातील विमानतळ पायाभूत सुविधांमधील उत्कृष्टतेचा पुरावा आहे. हे यश केवळ एक लँडिंग नाही, तर प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. अमरावती आणि संपूर्ण प्रदेशासाठी प्रगतीची नवी दारे उघडेल, अशी प्रतिक्रिया स्वाती पांडे यांनी दिली.
येत्या काही दिवसांत उद्घाटन सोहळ्यासह, अमरावती भारताच्या हवाई नेटवर्कमध्ये एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल. टियर-२ आणि टियर-३ शहरांना विमानसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पहिल्या यशस्वी विमान सेवेसह अमरावतीने आता हवाई नकाशावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
काही दिवसांपूर्वी अमरावती विमानतळावर ‘एअर कॉलीबशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेट’ अर्थात ‘पीएपीआय’ चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली होती. गेल्या १३ मार्चला अमरावती विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) परवाना दिला. ‘रिजनल कनेक्टिव्हीटी स्कीम’ अंतर्गत अमरावती विमानतळ हे अधिकृत परवानाधारक विमानतळ म्हणून घोषित झाले.