नागपूर : अखिल भारतीय काँग्रेसच्या उदयपूर अधिवेशनातील ठरावावर चर्चा होऊ नये म्हणून नागपूर जिल्हानिहाय आढावा बैठकीत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांच्या गुंडांकरवी हल्ला केल्याची तक्रार प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. आमदार विकास ठाकरे १० वर्षांपासून नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आहेत. उदयपूरच्या ठरावानुसार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्यांना पदमुक्त करायचे आहे.
तसेच एक पद एक व्यक्ती असाही ठराव होता. पण, विकास ठाकरे अद्यापही पदावर आहेत. ते आमदार आणि शहराध्यक्षपदी देखील आहेत. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा नावापुरता दिला आहे. शहर काँग्रेसचा कारभार तेच बघत आहेत. आढावा बैठकीच्या विषयपत्रिकेत उदयपूर ठरावावरील चर्चा होती. ते मुद्दे चर्चेले गेले नाही म्हणून त्यावर बोलण्यासाठी उभा झालो. मला बैठकीत बोलण्याची संधी मिळू नये म्हणून ठाकरे यांच्या समर्थकांनी तयारी करून ठेवली होती.
ई-मेलद्वारे केलेल्या तक्रारीत जिचकार यांनी खरगे यांना नागपुरात झालेल्या विभागीय आढावा बैठकीची विषयपत्रिका पाठवली आहे. उदयपूर ठरावावर बोलण्यास व्यासपीठावर जाऊन माईक हाती घेतला. या विषयावर चर्चा होऊ नये म्हणूनच अजेंड्यावरील चर्चा ते टाळतात. प्रदेश सचिव या नात्याने आपण विभागीय बैठकीत सर्व नेत्यांचे या मुद्याकडे लक्ष वेधणार होतो. मात्र आपणास बोलू दिले नाही. एवढेच नव्हे तर ठाकरे यांच्या गुंडांनी धक्काबुकी केली, अशी तक्रार जिचकार यांनी खरगे यांच्याकडे केली.