अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री करून घरी परत जाणाऱ्या नांदुरा येथील शेतकऱ्याला पोटे कॉलेज मार्गावरील जकात नाका परिसरात अडून त्याच्यावर सामूहिक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी शेतकऱ्याजवळील रोख २ लाख ७१ हजार रुपयांसह हातातील अंगठी, सोनसाखळी, मोबाईल फोन हिसकावून घेतला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे कठोरा मार्गावर प्रचंड खळबळ उडाली.
अमरावती शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नांदुरा या गावातील सजीव सौदागर हे शेतकरी आज आपला शेतमाल घेऊन अमरावतीला आले होते. शेतमालाची विक्री केल्यावर सायंकाळी ते आपल्या गावी परत जात असताना कठोरा मार्गावर पोटे कॉलेज पासून काही अंतरावरील जकात नाका परिसरात वास्तव्याला असणाऱ्या भटक्या समुदायातील जमावाने त्याला वाटेत अडवले. त्याच्यावर अचानक काठ्या, विटा, दगडाने सामूहिक हल्ला चढवला.
हेही वाचा >>>‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने अडवली ‘मान्सून’ची वाट! काय परिणाम होणार जाणून घ्या…
या घटनेत सज्जू सौदागर गंभीर जखमी झाले. संजू सौदागर बेशुद्ध पडल्यावर त्याच्याजवळील रोख २ लाख ७१ हजार रुपये तसेच हातातील अंगठी, सोनसाखळी, मोबाईल फोन हिसकावून घेतल्यावर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोटे कॉलेज परिसरात एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची माहिती मिळतात गाडगे नगर आणि नांदगाव पेठ अशा दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकरी संजू सौदागर यांचे नातेवाईक देखील घटनास्थळी धावून आले. नातेवाईकांनी जखमी संजू सौदागर यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दरम्यान, पोलिसांनी कठोरा मार्गावरील झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक महिला व पुरुषांना ताब्यात घेतले आहे.