नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा तोफा शांत झाल्यावर त्याच दिवशी रात्री महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याच्या घटनेने नागपूर जिल्हा हादरून गेला आहे. या हल्ल्यामागे नेमके कोण ? हल्ला झाला की घडवून आणला ? पोलिसांचे म्हणने काय ? राजकीय पक्षाचे आरोप कोणते ?असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केले जात आहे. दरम्यान या घटनेमुळे मतदारसंघातील वातावरण एकदम बदलून गेले आहे.
काटोल मतदारसंघ हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला समजला जातो. यावेळी त्यांनी ऐनवेळी स्वत: निवडणूक न लढवता मुलगा सलील देशमुख यांना रिंगणात उतरवले. त्यांच्या विरोधात भाजपने चरणसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. ठाकूर विरुद्ध देशमुख ही पारंपारिक लढत या मतदारसघांत असून ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. अत्यंत अटीतटीचा सामना काटोलमध्ये होईल, असा अंदाज बांधला जात असतानाच प्रचार संपल्यानंतर काही तासाच्या अंतराने अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात इसमांनी दगदडफेक केली. त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीने या लढतीला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
काय झाले नेमके ?
काटोल मतदारसंघातील नरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सलील देशमुख यांची शेवटची प्रचार सभा होती. ती आटोपून अनिल देशमुख, सलील देशमुख व त्यांचे कार्यकर्ते नरखेडहून तीनखेडा, भीष्णूर,मार्गे काटोल येथे जात असताना पारडसिंगा या गावाजळील बेलफाटा नजीक देशमुख यांच्या वाहन ताफ्यावर अज्ञात इसमांनी जोरदार दगडफेक केली. बेलफाटा हा नरखेडहून काटोलकडे जातानाचा वळण मार्ग असून आजूबाजूला ओसाड भाग आहे. तेथे वाहने हळू होतात. याच काळात देशमुख यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. देशमुख कारच्या पुढच्या सीटवर बसले होते. त्यामुळे त्यांना फुटलेली काच लागली. त्यात ते जखमी झाले. असे या संदर्भात काटोल पोलिसांकडडे देण्यात आलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
रुग्णालयात प्रचंड जमाव
घटनेची माहिती मिळताच देशमुख यांना पाहण्यासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ व भाजपच्या निषेधार्थ नारे दिले जात होते. येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्राथमिक उपचार झाल्यावर देशमुख यांना नागपूरमध्ये खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथेही काटोलहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते गेले. तेथेही घोषणा दिल्या जात होत्या. एकूणच सोमवारी रात्रीपासून मतदारसंघातील वातावरण तापले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा… भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
राजकीय आरोप, प्रत्यारोप काय ?
अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला हा त्यांनीच घडवून आणला तो राजकी स्टंट आहे, असा आरोप भाजप नेते अविनाश ठाकरे यांनी केला आहे. काटोल मतदारसंघात देशमुख पुत्र सलील पराभूत होणार हे दिसून आल्यावर अनिल देशमुख यांनी हा बनाव रचला, असा दावा ठाकरे यांनी केला. दुसरीकडे या हल्ल्यामागे भाजपच असल्याची शंका काटोलचे उमेदवार व अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी व्यक्त केली आहे