नागपूर: शहरातील वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. नागपुरात नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीसच सुरक्षित नसल्यास नागरिकांची सुरक्षा कोण करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाठोडा पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या बहादुरा रोड, टीचर कॉलनी या भागात गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अपघाताची भीषण घटना घडली. अपघातादरम्यान घटनास्थळी असलेल्या खोल खड्ड्यात पडून अश्विन गेडाम नावाच्या इसमाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शुक्रवारी सकाळी स्थानिकांना कळताच त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. यादरम्यान स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याठिकाणाहून जमावाला हटविण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान या ठिकाणी राहणाऱ्या बाबा बोकडे नावाच्या व्यक्तीने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. कोणतेही कारण नसताना पोलिसांना त्याने शिवीगाळ केली. हा वाद चिघळू नये म्हणून पोलिसांनी बाबा बोकडेला ताब्यात घेत पोलीस वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र बोकडे याने विरोध करण्यास सुरुवात केली याच वेळी रागाच्या भरात त्याने पोलीस अधिकाऱ्यासोबत धक्काबुक्की केली. हा वाद इतका चिघळला की त्याने थेट पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारत मारहाण करण्यास सुरुवात केली.
गर्दीत उपस्थित काही व्यक्तींनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. वाठोडा पोलिसांनी बाबा बोकडे याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात सरकारी काममध्ये अडथळा निर्माण करण्यासहित इतर कालमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाल्याने शहरात सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीसच सुरक्षित नसल्यास सामान्यांच्या सुरक्षेचे काय, नागपूर शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे काय असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.
हेही वाचा – गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात गर्भवती महिला ठार
पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याला मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या सूचनेवरून तातडीने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर कडक कारवाई करण्याची प्रक्रियाही पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीवर नेमकी कारवाई काय होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.