नागपूर : गृहमंत्र्याचे गृहशहरात महिला सुरक्षित नसल्याची आणखी एक घटना उघडकीस आली. पायी जाणाऱ्या एका महिलेचे भरदुपारी दोन युवकांनी तोंड दाबून उचलून झुडूपात नेऊन गँगरेप करण्याचा प्रयत्न केला. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा करीत एका आरोपीच्या हाताला चावा घेऊन तेथून पळ काढला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी दोनही आरोपींना अटक केली. कुबेरसिंग बागेशरण (३०) आणि सुनीलकुमार रुपशाह (३०) दोन्ही रा. उत्तरप्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. भरदुपारी एका महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्यामुळे सोनेगाव पोलिसांच्या गस्त प्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. ठाणेदार नितीन मगर यांचे सुरक्षाव्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष नसल्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
सोनेगाव परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय पीडित महिला विधवा आहे. तिला दोन मुले आणि भाऊ आहे. ती भावाच्या आधाराने राहते. धुणीभांडी करून मुलांचे पालन पोषण करते. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ती धुणीभांडी करण्यासाठी पायवाटेने जात होती. नातेवाईकांशी फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून मागून आलेल्या आरोपीपैकी एकाने महिलेचे तोंड दाबले तर दुसऱ्याने तिला उचलले. तिला आरडा ओरड करण्याची संधी सुध्दा मिळाली नाही. झुडूपात नेऊन तिच्यावर दोघांनीही सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने एकाच्या हाताला चावा घेऊन तेथून पळ काढला. आरडा ओरड करीत जवळच्या एका अपार्टमेंटमध्ये गेली. सुरक्षारक्षकाला घडलेला सारा प्रकार सांगितला.
हेही वाचा…एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
दरम्यान, लोकांची गर्दी झाली. भावालाही तिने माहिती दिली. सोनेगाव पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी मुळचे उत्तर प्रदेशातील असून मागील सात वर्षांपासून नागपुरात मजुरीचे काम करतात. त्यांचे कुटुंब गावी आहे. सध्या सोनेगाव परिसरात तीन महिन्यांपासून मजुरी करतात. दोघांनाही गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सोनेगाव ठाण्यातील कर्मचारी गस्त घालण्यासाठी हलगर्जीपणा करीत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.