यवतमाळ : स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर झालेला अत्याचार, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडखानी अशा घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघत असताना, यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यात तीन वर्षीय चिमुरडीवर अल्पवयीन बालकाने जनावरांच्या गोठ्यात नेऊन अत्याचार करण्याचा केला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी १५ वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारेगाव नजिक पूर्वेस असलेल्या एका गावात ही बालिका घराबाहेर खेळत होती. तिचे आई –  वडील शेतमजुरी करत असल्याने ते कामावर गेलेले होते. पीडित बालिका घरी आजीजवळ होती. सायंकाळी ती नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळायला गेली. त्याचवेळी आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका पंधरा वर्षीय बालकाने बालिकेस खेळण्याच्या बहाण्याने जवळ बोलाविले. त्यानंतर तेथे असलेल्या जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेली चिमुरडी रडायला लागल्याने तो शाळकरी विद्यार्थी तिला तेथेच सोडून गोठ्यातून बाहेर पडला. त्याचवेळी घरी आल्यानंतर मुलगी दिसत नसल्याने तिच्या वडिलांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला.  पीडितेचे वडील तिला शोधत असतानाच विधी संघर्षग्रस्त मुलगा गोठ्यातून बाहेर जाताना आढळला. तेथून चिमुरडीच्या रडण्याचा आवाज येत असल्याने वडिलांनी धावत जाऊन बघितले असता, त्यांचीच चिमुरडी तेथे रडत होती. बालिकेस विश्वासात घेत तिच्या आईने विचारपूस केल्यानंतर हा अल्पवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा हा गंभीर प्रकार उजेडात आला. बालिकेच्या आई – वडिलांनी तत्काळ  मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत, घडलेला प्रकार सांगितला व तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशायित विधी संघर्ष बालकावर बाल लैंगिक संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करून त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. या घटनेतील पीडित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे. तर संशयित विधी संघर्षग्रस्त बालकास बाल सुधार गृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मारेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सोळंके यांनी सांगितले. अधिक तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. या घटनेने मारेगाव तालुक्यात खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे. जिल्ह्यात महिला, तरुणी, बालिका कोणीच सुरक्षित नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.