अकोला : दहावीच्या परीक्षेचा पेपर देऊन घरी निघालेल्या दोन बहिणींवर ऑटो चालकाची वाईट नजर पडली. त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने दोन्ही बहिणींना ऑटोत बसवून निर्जनस्थळी नेण्यासाठी भरधाव ऑटो पळवला. ऑटो चालकाच्या वाईट वृत्तीचा अंदाज येताच दोन्ही बहिणींनी विरोध केला. चक्क धावत्या ऑटोतून रस्त्यावर उडी मारत दोन्ही बहिणींनी आपला जीव वाचवला. वाशीम जिल्ह्याच्या कारंजा शहरात ही धक्कादायक घटना घडली. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेल्या ऑटोचालकासह त्याच्या मित्रावर कारंजा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ जिल्ह्यातील २० वर्षीय युवती १ मार्च रोजी तिच्या लहान बहिणीचा दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने ती बहिणीसह रामनगर (पिंप्री फॉरेस्ट), ता. कारंजा येथे आली होती. परीक्षा केंद्राबाहेर दुपारी २.३० वाजताच्या सुमारास उभ्या असलेल्या ऑटो (क्र. एमएच १६ बी ९५८९) चालकाला तिने युवतीने रामनगर फाटा येथे जायचे असल्याचे सांगितले. चालकाने दोघी बहिणींना ऑटोमध्ये बसवले. त्या ऑटोमध्ये अगोदरच एक व्यक्ती बसलेला होता. ऑटो रामनगर फाट्याकड़े निघाला असता, थोड्या अगोदर चालकाने ऑटो थांबवला. त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याला दोघी बहिणींनी प्रचंड विरोध केला. त्या दोघी ऑटोमधून उतरून देखील गेल्या होत्या. ऑटो चालकाने दोघींना परत बसवले आणि ऑटो रस्त्याने वेगाने पळवला. त्यामुळे घाबरलेल्या दोन्ही बहिणींनी मोठ्या धाडसाने धावत्या ऑटोतून रस्त्यावर उडी मारली. त्या दोघी बहिणींनी मुख्य रस्ता गाठून आपला जीव वाचवला. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ऑटो चालक पंकज महादेव राठोड व त्याचा साथीदार (दोघेही रा. जनुना) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून माहिती लपविण्याचा प्रयत्न

संपूर्ण महाराष्ट्रासह वाशीम जिल्ह्यात मुली, युवती व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अशा प्रकारच्या घटनांची माहिती लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. कारंजा येथील अतिप्रसंग प्रकरणाच्या घटनेची माहिती पोलीस विभागाने अनेक तासांपर्यंत गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली आहे. अत्याचार व अतिप्रसंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने युवती व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.