नागपूर: सिव्हिल लाईनमध्ये राहणाऱ्या माजी न्यायाधीशांच्याच घरी एका अट्टल चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका चोरट्याला अटक केली. अनिकेत राऊत असे आरोपीचे नाव आहे.
सिव्हिल लाईनमधील लेडिज क्लब परिसरात सेवानिवृत्त न्यायाधीशांचे घर आहे. ते १६ ऑगस्टला कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. यादरम्यान अनिकेत राऊत आणि त्याच्या साथीदाराने न्यायाधीशांच्या बंगल्याचे कुलूप फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चोरी करण्यात अपयशी ठरले. याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक पुराव्यावरून अंबाझरी पोलिसांनी अनिकेत राऊतला अटक केली.
हेही वाचा… पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर, वीज कंपन्यांची चिंता वाढली
दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अनिकेत कुख्यात चोर असून त्याच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे न्यायाधीशांचीच घरे सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्यातील गस्तप्रणाली व्यवस्थित नसल्यामुळे चोरी-लुटमारीच्या घटना वाढल्याची चर्चा आहे.