वाशीम : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज विश्राम भवन येथे संजय देशमुख यांच्या उपस्थिती आढावा बैठक घेण्यात आली असून दिग्रस येथे ११ जून रोजी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
लोकसभेचे पडघम वाजू लागले असून वाशीम यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची पकड आहे. मात्र, शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवारांची यादी प्रसारमाध्यमावर प्रसारित झाली होती. यामध्ये यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर प्रथमच संजय देशमुख हे जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांनी मतदारसंघातील ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन ११ मे रोजी दिग्रस येथे होणाऱ्या मेळाव्याच्या पूर्व तयारी बाबत चर्चा केली. या बैठकीला यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे वाशीमचे जिल्हाप्रमुख डॉक्टर सुधीर कव्हर, माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळातील लोकसभेच्या निवडणुकीकरिता संजय देशमुख यांचे नाव समोर आल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असून आज झालेल्या बैठकीला जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या एकीचे प्रदर्शन दिसून आले.
हेही वाचा >>>“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी…” नाना पटोले यांची टीका, म्हणाले…
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या बाबतीत माघारलेलाच आहे. जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प रखडलेले असून रस्ते, सिंचन यासह अनेक समस्या सोडविण्यात विद्यमान खासदार भावना गवळी सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा असून उच्च विद्याविभूषित असलेले माजी मंत्री संजय देशमुख विरुद्ध विद्यमान खासदार भावना गवळी असा सामना होण्याची शक्यता आहे.