अकोला : जनावरांना ‘लम्पी स्किन डिसीज’ संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात १०९ जनावरांमध्ये या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले.
जिल्ह्यात निपाना ता. अकोला, तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यातील जनावरांना हा आजार झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०९ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यांचे त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. निपाणा येथील एका जनावरामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवाल तपासणीनंतर स्पष्ट झाले. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून १० किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करणास प्रतिबंध लावण्यात आला.
हेही वाचा : बुलढाणा : बेलगावात ‘सर्वधर्मसमभाव’चा पोळा; मंदिरात प्रारंभ, समारोप दर्ग्यावर
तसेच जिल्हा पशुसवंर्धन विभागाने प्रादुर्भाव भागातील पाच किमी परिघातील जनावरांना ‘गोट पॉक्स’ लसीकरण तात्काळ करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रभेटी देत असून जनावरांची पाहणी तपासणी केली. पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुकतरे यांनी शिवापुर येथे भेट देऊन जनावरांची पाहणी व तपासणी केली. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात बाधीत जनावरे आढळलेल्या ठिकाणापासून पाच किमी परिघाच्या क्षेत्रात ‘गोट पॉक्स’ लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
हेही वाचा : गोंदिया : रुग्णवाहिकेच्या चालकांवर उपासमारीची वेळ; सहा महिन्यांपासून मानधन रखडले
‘लम्पी स्किन डिसीज’ हा आजार बाह्य कीटकाद्वारे पसरतो. संसर्ग झाल्यास जनावरांना मध्यम स्वरूपाचा ताप २ ते ३ दिवस असतो. काही वेळा १०५ ते १०६ अंशापर्यंत ताप असू शकतो. ताप येऊन गेल्यानंतर शरीरावर २ ते ५ से.मी. आकाराच्या गाठी येतात. तोंडात, घशात व श्वसननलिकेत पुरळ येतात. तोंडातील पुरळामुळे जनावराची लाळ गळत राहते. जनावरात अशक्तपणा, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.