नागपूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही तब्बल ११ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली व मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला. आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात नागपूर जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.
भाजपचे नागपूर जिल्ह्यात आठ आमदार आहे. तर शिवसेनेचा (शिंदे) एक आमदार आहे. यातील सर्वंच फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात येण्यास इच्छुक आहे. परंतु, हे महायुतीचे सरकार असल्याने आणि नागपूरकडे मुख्यमंत्रीपद आल्याने भाजपकडून जास्त मंत्री केले जातील, असे सांगण्यात येत आहे. यात प्रमुख दावेदार पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आहे. ते सलग चौथ्यांदा व मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे.
हेही वाचा…अमरावती : गुरू येणार पृथ्वीच्या सर्वांत जवळ कधी, कसे पाहता येणार जाणून घ्या…
u
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील चौथ्यांदा आमदार झाले आहे. ते यापूर्वी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री राहिले आहे. यावेळी पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी कायम ठेवतात की मंत्रिपद देतात याकडे लक्ष लागले आहे. हिंगणाचे आमदार समीर मेघे हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. त्यांनी आमदारकीची हॅटट्रीक साधली आहे. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते हे सुद्धा तिसऱ्यांदा निवडून आले आहे. ते फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जातात.
डॉ. आशिष देशमुख हे दोनदा आमदार झाले आहे. यावेळी सावनरेमधून त्यांनी बाजी मारली असून माजी मंत्री सुनील केदार यांच्या गडाला खिंडार पाडले आहे. २०१४ मध्ये त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काटोलमध्ये पराभूत केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सावनेर मतदारसंघात निवडणूक प्रचार करताना ‘तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो,’ असे मतदारांना आवाहन केले होते. त्यामुळे आशिष देशमुख मंत्रीपद मिळण्याची आस लावून बसले आहे.
हेही वाचा… देवेंद्र लहानपणापासून खोडकर पण…मोठी बहीण स्वाती फडणवीस साठे यांचा आठवणींना उजाळा
शिवसेनेला जिल्ह्यात मंत्रिपद?
शिवसेना (शिंदे) महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रमुख घटक पक्ष आहे. या पक्षाने नागपूर जिल्ह्यात रामटेकची एकमेव जागा लढली व जिंकली आहे. शिवसेना नागपूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेकडून रामटेकचे ॲड. आशिष जयस्वाल यांना संधी मिळण्याची आशा आहे. जयस्वाल विदर्भातील शिवसेनेचे प्रमुख शिलेदार आहेत. ते चौवथ्यांदा आमदार झाले आहे.
दहा वर्षे नागपूरकडे ऊर्जामंत्री पद
मागील दहा वर्षांमध्ये प्रथम चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. नितीन राऊत आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जामंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवीन सरकार स्थानापन्न होणार आहे. त्यामुळे नवीन सरकारमध्ये ऊर्जामंत्रीपद नागपूरला की बाहेरच्या जिल्ह्याला मिळेल, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाच्या व वजनदार खात्यापैकी एक म्हणून ऊर्जा खात्याकडे बघितले जाते. त्यामुळे ऊर्जामंत्रीपद मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गजांकडून प्रयत्न होतात. २०१४ मध्ये युतीचे सरकार आल्यावर बावनकुळे यांच्याकडे सलग पाच वर्षे ऊर्जामंत्रीपदाची जबाबदारी आली. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आले. या सरकारमध्ये नागपुरातील डॉ. नितीन राऊत यांना ऊर्जामंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. २०२२ मध्ये शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आले. तेव्हाही ऊर्जामंत्रीपदाची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे आली. दहा वर्षांत ऊर्जामंत्रीपद सलग नागपूरकडे राहिले आहे. आता हे पद कोणला मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.