चंद्रपूर : शिवद्रोही प्रशांत कोरटकर याची चंद्रपुरातील आलिशान हॉटेलात मुक्कामाची व्यवस्था करण्यापासून तर तेलंगणा राज्यात पळून जाण्यापर्यंत त्याच्यासोबत असणारा प्रशिक पडवेकर हा भाजप कार्यकर्ता होता की नाही? हे गृहखात्याने स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी व इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर कोरटकर फरार झाला होता. तो चंद्रपुरात असल्याची माहिती होती, तेथून तो तेलंगणात गेला होता. तेथे त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत पडवेकर होता. त्यालाही ताब्यात घेण्यात आले होते. आता कोल्हापूर पोलिसांनी त्याला चंद्रपूरमधून अटक केली आहे. पडवेकर हा भाजप कार्यकर्ता होता का? असा सवाल करीत गृहखात्याने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी लोंढे यांनी केली.
कोरटकर चार दिवस चंद्रपुरात
कोरटकर हा फरार असताना ११ ते १५ मार्चदरम्यान चंद्रपुरात मुक्कामी होता. कोरटकरला चंद्रपुरात सुरक्षित आणण्यापासून, तर हॉटेलात पाहुणचार आणि तेलंगणात पळून जाण्यात मदत करणाऱ्या चौधरी, पडवेकर आणि सिद्धार्थ प्रिमिअर हॉटेलचे मालक यांनी या प्रकरणात मदत केल्याची माहिती आहे. कोरटकर आणि पडवेकर एकाच वाहनाने तेलंगणात सोबत गेले. ज्या वाहनाने कोरटकर तेलंगणात पळून गेला ते वाहन चौधरीच्या कुटुंबातील एका सदस्याचे आहे, अशी माहिती आहे. सध्या चौधरी फरार असून पडवेकरला अटक झाली आहे. दरम्यान, लोंढे यांनी पडवेकर हा भाजप कार्यकर्ता असल्याची आमची माहिती आहे ती खरी आहे काय? असा सवाल करत याबाबत गृहखात्याने खुलासा करावा अशी मागणी केली.
पडवेकर कोण?
कोरटकरसाठी चंद्रपुरात राहण्याची सर्व व्यवस्था करणारा पडवेकर हा भाजपच्या एका बड्या नेत्याच्या कार्यालयात काही वर्षांपूर्वी काम करीत होता. तो मूळचा चंद्रपूरचा राहणारा असून मागील काही वर्षांपासून नागपुरात वास्तव्याला आहे. पडवेकर हा कोरटकरला मोठ्या भावाप्रमाणे मानतो. समाज माध्यमावर त्याने पोलीस अधिकारी आणि भाजप आमदार, खासदार यांच्यासोबतच छायाचित्र सार्वत्रिक केले आहे. तो नागपुरातील भाजपच्या एका दिग्गज नेत्याच्या सेवेत होता.
कोरटकरला अटक झाली तेव्हा पडवेकर यांच्या सोबत होता. कोल्हापूर पोलीस त्याला सोबत घेऊन गेले. कोरटकर यांना खरी मदत कोणी केली? तो भाजप कार्यकर्ता आहे किंवा नााही हे गृहखात्याने सांगावे.-अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, प्रदेश काँग्रेस</strong>