वर्धा, रस्ते अपघातात दरवर्षी हजारो बळी जात असल्याची आकडेवारी नवी नाही. त्यातही  प्रामुख्याने दुचाकीस्वार रस्ते अपघातात प्रामुख्याने ठार पडत असल्याचे चित्र आहे. म्हणून हेल्मेट सक्ती करण्यात येते. पण त्यास गांभीर्याने घेतल्या जात नसल्याची स्थिती आहे. सक्ती केली की लहान गावात ओरड होण्याची बाब परिचितच. या पार्श्वभूमीवर  सुरक्षेचा अनोखा संदेश देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य म्हणता येईल.

सेलू तालुक्यातील चानकी या गावात राहणारे अतुल पन्नासे व रोशन गाठे हे जिवलग मित्र. दोघांनाही समाजकार्यांची आवड. दोघेही शेती करीत उदरनिर्वाह भागविणारे. एकमेकांशिवाय पान नं हलणाऱ्या या मैत्रीत संकट आले. ७ मार्च रोजी रोशन हा वर्धेकडे निघाला असतांना वाटेत स्पीड ब्रेकरला त्याची गाडी अडून ती बाजूला रस्ते दुभाजकावर कोसळली. त्यात रोशनचा मृत्यू झाला. मित्र अतुलच नव्हे तर सर्व गाव हळहळले. डोक्यास मार लागल्याने हा मृत्यू ओढविला, हे स्पष्ट झाले. त्याचे अतीव दुःख अतुल यांस झाले.

डोक्यावर हेल्मेट असते तर मित्र कदाचित वाचला असता, अशी बोच लागली. त्याचा मृत्यू कुटुंबास मोठा धक्का देणारा ठरला. हे दुःख इतरांच्या वाटेस येवू नये अशी भावना झाली. काय करावे या विचारात अतुल. म्हणून मग अपघातात असे मृत्यू टळावे व मित्राची स्मृती म्हणून अतुलने हेल्मेट वाटण्याचा मानस व्यक्त केला. जिवलग मित्र गेला. त्याचे कारण म्हणजे सुरक्षा कवच नसणे, अशी भावना झालेल्या अतुलने १०० हेल्मेट वाटण्याचे ठरवले. त्याची परिस्थिती बेताचीच. शेतीवरच गुजराण. मात्र हा संकल्प पूर्ण करायचाच असा निर्धार त्याने ठेवला.

सुरवात २५ हेल्मेट वाटून झाली आहे. मित्र परिवार तसेच रस्त्यावरील गरजू दुचाकीस्वारांना त्याने विनामूल्य हेल्मेट दिले. अतुल पन्नासे यांचे हे मित्रप्रेम व रस्ते सुरक्षाचा संदेश देण्याचे प्रयत्न याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्यांनी स्वतः खरेदी करीत हे हेल्मेट वाटप करतांना त्यांचे सहकारी सुरज कडू, धनराज पोकळे, सुनील बावणे, मयूर वाहूरकर, विशाल हेपट, देवेंद्र पाठक यांचे सहकार्य उपक्रम राबविण्यात मिळाले. टप्प्याटप्प्याने १०० हेल्मेट वाटल्या जाणार आहेत. हा कृतिपर संदेश लोकांना जाणीव करून देणारा ठरेल. या पासून बोध घेत इतर वाहनचालक  स्वतः खरेदी करीत हेल्मेट खरेदी करतील, असा अतुल पन्नासे यांना विश्वास वाटतो.