गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज शहरात सध्या एका सावकाराच्या ऑडियो क्लिपची चर्चा आहे. यात तो सावकार दारू पिऊन कर्जदाराला ‘पैसे नसेल देत तर तुझ्या बायकोला मला विक, अशी मागणी करीत अश्लील भाषेत बोलत आहे. दोघांत मोबाईलवर झालेले हे संभाषण समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाले आहे. एवढेच नव्हे तर तक्रार करण्यासाठी गलेल्या महिलेची समजूत काढून एका पोलिसाने त्या सावकाराकडून १५ लाख उकळल्याचीदेखील खमंग चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देसाईगंज शहरात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचा धंदा चालतो. गरजूला वेळेवर कर्ज देत अव्वाच्या सव्वा व्याज वाढवून दुप्पट वसुली करण्याचेही प्रकार सर्रास चालतात. अशात एका राजकीय पक्षाचा नेता असलेल्या सावकाराने गावातीलच व्यक्तीला काही लाखांचे कर्ज दिले होते. कर्ज फेडण्यास उशीर झाल्याने मूळ रकमेवर व्याज लावून त्या सावकाराने कर्जदारकडे ८५ लाखांची मागणी केली. परंतु एवढी मोठी रक्कम तात्काळ देण्यास कर्जदाराने असमर्थता दर्शवली. यावरून त्या सावकाराने पैशांसाठी तगादा लावला. तो नेहमी कर्जदाराला फोन करून अर्वाच्च भाषेत बोलायचा. त्यांच्या संभाषणाची क्लिप सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली असून यात तो सावकार दारू पिऊन कर्जदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत आहे. पैसे नसेल तर तू तुझ्या बायकोला मला विक, अशाप्रकरची मागणी करीत आहे.

हेही वाचा – वर्धा : रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा अन् स्थानिक प्रशासनाचा काळजाचा ठोका चुकतो तेव्हा..

हेही वाचा – देशातील वीज हानीचे प्रमाण १२ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य; अवैध जोडण्या, वीज चोरीचा फटका

इतकेच नाही तर कर्जदाराच्या पत्नीने जेव्हा फोन घेतला तेव्हा तो तिच्यासोबतदेखील अतिशय खालच्या पातळीवर बोलला. या प्रकारामुळे संतापलेल्या त्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली, तो सावकारही तेथे येऊन प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करू लागला. शेवटी एका कागदावर दोघांची स्वाक्षरी घेत प्रकरण आपापसात मिटवण्यात आले. मात्र, यात एका पोलिसाने त्या सावकाराकडून १५ लाख उकळल्याची चर्चा आहे. सध्या या प्रकरणाची देसाईगंजसह जिल्हाभरात चांगलीच चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audio clip of a moneylender is currently in discussion in desaiganj city ssp 89 ssb