वर्धा : २२ ऑगस्ट हा वर्धा शहरपक्षी दिन असून पाच वर्षांपूर्वी वर्धानगरीचा शहरपक्षी ठरविण्याकरिता पक्ष्यांची निवडणूक आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या या आगळ्यावेगळ्या निवडणुकीचा निकाल २२ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत सुमारे ५२ हजार वर्धेकरांनी मतदान केले होते. त्यात ‘भारतीय नीलपंख’ या पक्ष्याला वर्धेकरांनी सर्वाधिक पसंती दिली होती. या शहरपक्ष्याचे शिल्प वर्धानगरीत उभारले जावे, याकरिता बहार नेचर फाउंडेशनने सातत्याने पाठपुरावा केला. बहारच्या या मागणीला यश आले आणि शहराच्या प्रवेशद्वारावर नीलपंख पक्ष्याचे भव्य व आकर्षक शिल्प उभारण्यात आले.
वर्धा नगरपरिषद आणि बहार नेचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही निवडणूक महाराष्ट्रातली दुसरी तर विदर्भातील पहिली निवडणूक होती. या निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष्यांचे महत्त्व विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न बहारने केला. या निवडणुकीचा निकाल ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या उपस्थितीत जाहीर झाला. या अनोख्या पर्यावरणीय उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. शिवाय, या उपक्रमापासून प्रेरणा घेत महाराष्ट्रातील अनेक शहरांनी शहरपक्षी निवडणुकीचे आयोजनही नंतरच्या काळात केले. वर्धानगरीच्या सीमेवर देखणा नीलपंख स्थापित झाल्यानंतर पवनार येथील परमधाम आश्रमाजवळील पार्कच्या प्रवेशद्वारावर फायबरचे तर पिपरी येथील हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या ऑक्सिजन पार्कच्या कमानीवर धातूचे नीलपंखाचे शिल्प बसविण्यात आले. याशिवाय, आयटीआय टेकडी परिसरातील निसर्ग सेवा समितीचे ऑक्सिजन पार्क आणि जनहित मंचाचे मुक्तांगण येथेही शहरपक्षी नीलपंखाची माहिती देणारे फलक लावण्यात आले.
हेही वाचा – धक्कादायक! राज्यात ११ लाख ग्राहकांकडे नादुरुस्त वीज मीटर
याच वर्षी वर्धानगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित झाले. या संमेलनातील आर्ट गॅलरीत नीलपंखाच्या छायाचित्राने साहित्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे कवी संजय इंगळे तिगावकर यांनी या संमेलनासाठी लिहिलेल्या नऊ कडव्यांच्या वर्धा गौरव गीतातील ‘अभयारण्ये अन् धरणांची, नीलपंखाची नगरी’ हा उल्लेख वर्धेकरांना सुखावून जाणारा आहे.
गांधीविनोबांची कर्मभूमी आणि बोर व्याघ्र प्रकल्प यामुळे वैश्विक ओळख असलेल्या या जिल्ह्याला नीलपंखाच्या भव्य, आकर्षक आणि आगळ्यावेगळ्या शिल्पाने नवी ओळख दिली आहे. वर्धानगरीच्या सीमेवरील नीलपंखाच्या भव्य शिल्पाजवळ युवावर्गाची, आबालवृद्धांची गर्दी सतत दिसते. वर्ध्यात येणारे पाहुणे सेवाग्राम, पवनारला भेट देतानाच नीलपंखापाशीही रेंगाळताना दिसतात. या निमित्याने वेगवेगळे उपक्रम होतात.