वाशीम : जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात १४ जानेवारी रोजी रात्री हयात दादा कलंदर दर्ग्यातील ऊर्सनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत चक्क औरंगजेबाचे छायाचित्र, बॅनर लावण्यात आल्याची चित्रफीत सार्वत्रिक होताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा – खळबळजनक! ४० हजारांमध्ये ५ लाखांच्या नकली नोटांची विक्री…
गेल्या अनेक वर्षांपासून मंगरूळपीर येथे वार्षिक ऊर्सनिमित्त ‘संदल’चे आयोजन करण्यात येते. शनिवारी ऊर्ससाठी पोलिसांनी केवळ दोन ‘डीजें’ची परवानगी दिली होती. मात्र, तब्बल २१ ‘डीजे’ वाजवण्यात आले. यात काही जण चक्क औरंगजेबाचे छायाचित्र घेऊन नाचतानाची चित्रफीत सार्वत्रिक झाली. आज, रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवला. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर मंगरूळपीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.