नागपूर : बारावीची विद्यार्थिनी ज्या ऑटोतून शाळेत जात होती, त्याच ऑटोच्या चालकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिला फूस लावून पळवून नेले. ती १८ वर्षांची होताच तिच्यासोबत बळजबरी लग्न लावले. या प्रकरणाचा छडा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने लावला असून दोघांनाही ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. इम्रान जलील मालाधारी (२४) असे आरोपीचे नाव आहे.

४० वर्षीय महिला ही मुलगी श्रद्धा (बदललेले नाव) हिच्यासोबत मध्यप्रदेशातून कामाच्या शोधात नागपुरात आली. ती खासगी काम करीत आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करीत होती. श्रद्धाला शाळेत ने-आण करण्यासाठी ऑटो लावला होता. त्या ऑटोवर चालक म्हणून इम्रान जलील हा होता. रोज सोबत जाणे आणि शाळेतून घरी आणणे, असा नित्यक्रम सुरु होता. यादरम्यान, ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेत इम्रानने तिला जाळ्यात ओढले.

हे ही वाचा…लोकजागर: काँग्रेसचा वैरी काँग्रेस!

तिला प्रेम करीत असल्याचेे सांगून लग्न करण्याचे आमिष दाखवले. तीसुद्धा ऑटोचालकाच्या प्रेमात आकंठ बुडाली. श्रद्धाला १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी १० दिवसाचा अवधी बाकी असतानाच इम्रानने तिला फूस लावली आणि लग्न करण्यासाठी पळवून नेले. दोघेही थेट गोंदियाला राहणाऱ्या आजोबाच्या घरी गेले. दुसरीकडे मुलगी दिसत नसल्याने आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख ललिता तोडासे करीत होत्या. दरम्यान श्रद्धा १८ वर्षाची पूर्ण झाल्याच्या दिवशी इम्रानने तिच्याशी लग्न केले. दोघेही आजोबाच्या घरी राहात होते. काही दिवसांनी इम्रानचा पत्ता लागला आणि पोलिसांनी लोकेशन मिळविले असता तो नागपुरात आल्याचे कळले. पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता दोघेही घरीच मिळून आले. पथकाने दोघांनाही ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. एमआयडीसीचे ठाणेदार महेश चव्हाण यांनी आरोपीला अटक करुन त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

हे ही वाचा…नागपूर : श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजयुमो कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि गोंधळ, काय घडले?

आई…माझे त्याच्यावर प्रेम आहे…

आईला एकुलती असलेल्या मुलीला शिकवून मोठे करावे, अशी इच्छा आईची होती. मात्र, शाळेत ने-आण करणाऱ्या ऑटोचालकाने तिच्याशी गोडीगुलाबीने बोलून जाळ्यात ओढले. पोलिसांनी श्रद्धाला आईच्या ताब्यात दिले आणि घरी नेण्यास सांगितले. ‘आई…माझे इम्रानवर प्रेम आहे… तो माझा पती आहे… मला त्याच्याच सोबत राहायचे आहे…त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत…’ असे म्हणून पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. इम्रानला सोडल्याशिवाय घरी जाणार नाही, अशी भूमिका घेतली. शेवटी पोलिसांनी तिची समजूत घातली. पोलिसांनी इम्रानला अटक करुन थेट मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.