अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत भुसावळ-बडनेरा खंडातील बडनेरा – टाकळी – कुरुम दरम्यान स्वयंचलित ‘ब्लॉक सिग्नलिंग’ प्रणाली ३ एप्रिलपासून कार्यान्वित करण्यात आली. बडनेरा – कुरुमदरम्यान १६.२१ कि.मी. खंडातील स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली बसविण्यात आली आहे. ही अत्याधुनिक प्रणाली रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासह विलंब कमी करणे आणि एकूणच सुरक्षितता मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे. या अत्याधुनिक स्वयंचलित ‘सिग्नलिन’ प्रणालीमुळे एकाच मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांमधील अंतर कमी होऊन वेळ वाचेल.

स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली म्हणजे वाहतूक घनतेच्या आधारे साधारणतः प्रत्येक एक किमी किंवा ४०० मीटर अंतरावर सिग्नल बसविणे. ज्यामुळे अधिक गाड्या चालवता येतील. एखादी गाडी सिग्नल पार केल्यावर, ती पुढच्या स्थानकावर पोहोचण्याच्या आधी दुसरी गाडी सोडली जाऊ शकते. या कार्याच्या अंमलबजावणीसाठी चार दिवसांचे प्री-नॉन इंटरलॉकिंग कार्य आणि एक दिवसाचे नॉन इंटरलॉकिंग कार्य नियोजित करण्यात आले होते. प्री-नॉन इंटरलॉकिंग कार्य पूर्ण झाल्यानंतर, नॉन इंटरलॉकिंग कार्य ०३ एप्रिल रोजी पार पडले. त्यामध्ये ही प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित झाली. या सोबतच दोन पूर्ण ब्लॉक सेक्शन (बडनेरा-टाकळी आणि टाकळी-कुरुम) स्वयंचलित ब्लॉक सेक्शनमध्ये रुपांतरित करण्यात आले. यामध्ये डाऊन दिशेस १२ स्वयंचलित सिग्नल आणि ०१ अर्ध-स्वयंचलित सिग्नल बसविण्यात आले आहेत, तर अप दिशेस ११ स्वयंचलित सिग्नल आणि ०१ अर्ध-स्वयंचलित सिग्नल बसविण्यात आले आहेत.

भुसावळ विभागात १०५.९६ कि.मी. स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली

या प्रगतिशील उपक्रमाच्या अंतर्गत भुसावळ – बडनेरा खंडात आतापर्यंत एकूण १०५.९६ कि.मी. स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली यशस्वीपणे बसविण्यात आली आहे. स्वयंचलित ‘ब्लॉक सिग्नलिंग’ प्रणाली कार्यान्वित झाल्याने या खंडाची लाइन क्षमता वाढेल. ज्यामुळे भुसावळ – बडनेरा या अत्यंत गर्दीच्या व व्यस्त मार्गावरील गाड्यांची गर्दी कमी करण्यास मदत होईल. या नवीन प्रणालीमुळे गाड्यांची गती सुधारेल आणि वेळेवर संचालनास मदत होईल, ज्यामुळे प्रवाशांना अधिक चांगला प्रवास अनुभव मिळेल, असा दावा मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केला आहे.

प्रवाशांचा खोळंबा टळणार

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत १०५.९६ कि.मी. स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित झाल्याने दोन रेल्वे गाड्यांमधील अंतर कमी होऊन विलंब होणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा देखील खोळंबा टळून त्यांना मोठा दिलासा मिळेल.