अकोला : मध्य रेल्वेच्या अकोला ते वरणगाव विभागात ९०.४५ कि.मी.चे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ करण्यात आले आहे. या भागातील मलकापूर – बिस्वा ब्रिज (१४.०२ कि.मी.) स्वयंचलित सिग्नल प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित झाली. त्यामुळे आता दर एक कि.मी. विभागामध्ये एक रेल्वे गाडी चालवणे शक्य होईल. त्यामुळे गाड्यांचा खोळंबा टळणार असून वेळेची बचत होईल.
भुसावळ विभागातील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. भुसावळ – बडनेरा मार्गावरील मलकापूर – बिस्वा ब्रिज (१४.०२कि.मी.) या खंडात स्वयंचलित ‘ब्लॉक सिग्नलिंग’ प्रणाली २४ फेब्रुवारीपासून यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.
स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली म्हणजे वाहतुकीच्या घनतेनुसार प्रत्येक एक कि.मी. अंतरावर किंवा ४०० मीटर अंतरावर सिग्नल बसवले जातात. परिणामी, एका गाडीने सिग्नल पार केल्यानंतर दुसऱ्या गाडीला लगेचच मार्ग मिळतो. ज्यामुळे अधिक गाड्या चालवता येतात आणि वेळेची बचत होते. या महत्त्वपूर्ण उपलब्धीसह चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवर एकूण ५८.३२ रूट कि.मी.वर स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ प्रणाली यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे.
मलकापूर – बिस्वा ब्रिज येथे नव्याने कार्यान्वित स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीचे काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये एमएसडीएसी आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग सुविधेसह २१ नवीन स्वयंचलित सिग्नल आणि १० सेमी-स्वयंचलित सिग्नल बसवले आहेत. ४८ कोर ऑप्टिकल फायबर केबल आणि यूएफएसबीआय प्रणालीचा समावेश आहे. स्थानक “ऑटो हट” मध्ये रूपांतरित करण्यात आले. त्यामुळे परिचालन कार्यक्षमता वाढेल. इलेक्ट्रॉनिक लॉगिंग उपकरणे व आरडीएससो मान्यताप्राप्त अग्नि अलार्म सिस्टम कार्यान्वित राहणार आहे.
शेगाव नियंत्रण बोर्ड आता पूर्णतः स्वयंचलित
मलकापूर – बिस्वा ब्रिज (१४.०२कि.मी.) या खंडात स्वयंचलित ‘ब्लॉक सिग्नलिंग’ प्रणालीच्या कार्यामुळे भुसावळ – शेगाव नियंत्रण बोर्ड आता पूर्णतः स्वयंचलित झाले असून, वरणगाव – अकोला मार्गावर एकूण ९०.४५ किलोमीटर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली प्रभावीपणे कार्यरत आहे. ही अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणाली रेल्वे वाहतूक अधिक वेगवान व सुरक्षित करण्यास मदत करेल. प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी यामुळे मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे भुसावळ-बडनेरा भागात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. तसेच मार्ग क्षमता सुधारली जाईल. यामुळे गाड्यांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. रेल्वेस्थानका दरम्यान प्रत्येक एक किमी अंतरावर सिग्नल बसवले गेले आहेत. त्यामुळे दर एक किमी भागामध्ये एक रेल्वे गाडी चालवणे शक्य होईल. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि गाड्यांचा खोळंबा कमी होईल. कमी वेळात जास्त गाड्या चालवता येणार आहेत.