अकोला: लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी हिरहिरीने सहभाग घेतला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केंद्राबाहेर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. युवा मतदारांसह ज्येष्ठ मतदारांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण दिसून आले. अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५६.१६ टक्के मतदान झाले. अनेक मतदान केंद्रावर उशीरापर्यंत मतदान सुरू होते. एकूण सरासरी मतदान ६५ टक्के झाल्याचा अंदाज आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजतापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली.

अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी ११ वाजेपर्यंत १६.३४ टक्के मतदान पार पडले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अकोला जिल्ह्यात सरासरी २९.८७ टक्के मतदान झाले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६.१६ टक्के मतदान झाले असून त्यामध्ये अकोट मतदारसंघात ५७.६०, बाळापूर ५८.३०, अकोला पश्चिम ५४.४५, अकोला ५१.२८ व मूर्तिजापूर मतदारसंघात ६०.०८ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची मुदत होती.

हेही वाचा – स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच ‘या’ गावात मतदान, नागरिकांसाठी ऐतिहासिक आनंदाचा क्षण

शेवटच्या टप्प्यात मतदान करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सायंकाळी उशीरापर्यंत केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. जिल्ह्यातील सरासरी मतदान ६५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, अकोला शहरातील बी.आर हायस्कूल येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे प्रकार समोर आले. याशिवाय देखील काही ठिकाणी मतदार यंत्रात बिघाडाच्या तक्रारी होत्या. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन पर्यायी व्यवस्था केली. प्रशासनाच्यावतीने विविध ठिकाणी तयार केलेले आदर्श मतदान केंद्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

हेही वाचा – चंद्रपूर : शहरात मतदारांमध्ये निरुत्साह तर ग्रामीणमध्ये उत्साह, सायंकाळी ५ पर्यंत ६४.४८ टक्के मतदान

वरिष्ठ नेत्यांसह उमेदवारांनी बजावला हक्क

अकोला जिल्ह्यात खासदार अनुप धोत्रे, वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, अकोला पश्चिमचे विजय अग्रवाल, वंचित समर्थित अपक्ष हरीश आलिमचंदानी, काँग्रेसचे अकोटचे उमेदवार ॲड. महेश गणगणे, मूर्तिजापूरचे भाजप उमेदवार हरीश पिंपळे आदींनी कुटुंबीयांसह आपला मतदानाचा हक्क बजावला.