नागपूर : देशातील अनेक राज्यांत यंदा मान्सूनने सरासरी गाठली नाही. महाराष्ट्रातदेखील २४ जिल्ह्यांत पाऊस कमी झाला असून धरणांमध्ये जलसाठा कमी झाला आहे. या सर्वांचा परिणाम शेतीवर होणार असून खरीप आणि रब्बी हंगामात उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, जून व ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट राहिल्यामुळे ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस झाला नाही, असे राज्याच्या कृषी खात्याने म्हटले आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ८९० मंडळात खरीप पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे शेतीमालाच्या उत्पादनात मोठी तूट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यातील उत्पादन घटणार आहे.
हेही वाचा – “आजारी पत्नीमुळे प्रेमविवाह केला पण…”, भरोसा सेलच्या मध्यस्तीने संसार पुन्हा सुरळीत
हेही वाचा – खासगी बँकांबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांची नाराजी, म्हणाले…
केवळ खरीपच नाही तर रब्बी हंगामावरदेखील परिणाम होणार आहे. धरणात जलसाठा कमी असल्यामुळे आधी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि त्यानंतर शेतीचे नियोजन राहील. त्याचा परिणाम रब्बी हंमामाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.