नागपूर : अंबाझरी ओव्हर फ्लोनंतर पाणी वेगाने रस्त्यालगतच्या भिंतीवर आदळून अंबाझरी लेआऊट आजूबाजूंच्या वस्त्यांत शिरले. हे पाणी भिंतीला न अडता नाल्याद्वारे पुढे गेले असते तर नागनदीला आणखी पूर येऊन हे पाणी मध्य आणि पूर्व नागपूरमधील वस्त्यांमध्ये शिरले असते व स्थिती हाताबाहेर गेली असती, असे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सांगितले.
अंबाझरी लेआऊट व परिसरातील वस्त्या सुटसुटीत व बहुमजली आहेत. त्यामुळे तेथे पाणी गेल्यावर अनेकजण वरच्या मजल्यावर स्थानांतरित झाले. रस्ते मोठे असल्याने पाणी जायला जागा होती. त्यामुळे पाणी पसरत गेले. मात्र, अंबाझारी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते सर्व पाणी पुढे नाल्यात गेले असते तर नाल्याला पूर आला असता व हा नाला पुढे नागनदीला मिळत असल्याने नदीत पाण्याचा प्रवाह अधिक वाढून तो पुढे मध्य, पूर्व नागपूरकडे गेला असता. या भागात दाटीवाटीने वस्त्या असून अनेक छोटी घरे आहेत. तेथे पाणी गेल्यावर लोकांना हलताच आले नसते व पाणी काढण्यासाठी यंत्रणेलाही तत्काळ तेथे पोहोचता आले नसते, मोठा हाहाकार उडाला असता, असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – नागपूरवर आता संसर्गजन्य आजारांचे सावट! ‘या’ रोग आजाराचा सर्वाधिक धोका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात अविनाश ठाकरे त्यांच्यासोबत होते. त्यांनी अंबाझरी लेआऊट, कार्पोरेशन कॉलनी व अन्य वस्त्यांची पाहणी केली. पूरस्थिती निर्माण होण्याची कारणे विशद करताना ठाकरे म्हणाले, प्रचंड पाऊस हेच पूरस्थिती निर्माण होण्याचे कारण आहे. अंबाझरी तलावात पाणी संचय वाढल्यावर तेथून पाण्याचा ओढा रस्त्यावर आला व पुढे तो ‘क्रेझी केसल’वर आदळला, त्यामळे तेथील भिंत पडून पाणी इतरत्र वळले. नाल्याद्वारे ते आजूबाजूंच्या वस्त्यांमध्ये शिरले. पाण्याचा प्रवाह येथे अडला नसता तर तो नाल्याद्वारे नागनदीला मिळून पुढे गेला असता.