लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम म्हणजे सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, अशी चिंता वाटत असतानाच आता आचारसंहितेचे कारण देत वेतनही दिवाळीपूर्वी देण्यास टाळाटाळ केली जात असून महिनाभर काम केल्यावर वेतन मिळते, त्याचा आचार संहितेशी संबंध काय? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी प्रशासनाला केला आहे.

दिवाळी सण तोंडावर आल्याने राज्यभरातील सर्वच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना दिवाळी सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्याच्या सूचना राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी वेतनही देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर एसटी कर्मचारी व अधिकारी यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी सरकारकडून ३५० कोटी रुपयांची सवलत मूल्य परतावा रक्कम देण्यात आली आहे. असे असताना वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असून आचारसंहितेची भीती वाटत असल्याने वेतन उशिरा दिले जाणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आचारसंहिता नाही. परंतु एसटी कर्मचाऱ्यांना आहे, हे दुटप्पी धोरण असून “भित्या मागे ब्रह्मराक्षस “अशी प्रशासनाची अवस्था झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशा शब्दात बरगे यांनी टोला लगावला.

आणखी वाचा-विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी… वसतिगृह प्रवेशातील ‘विशेष कोटा’ अखेर रद्द…

एकीकडे एसटी कर्मचारी व अधिकाऱ्याना दिवाळी भेट रक्कम मिळण्याची शक्यता धूसर झाली असतानाच आता वेतनही दिवाळीपूर्वी मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कर्मचाऱ्यांनी महिनाभर काम केल्यावर संबंधित महामंडळ, शासनाकडून वेतन मिळते. त्याचा व आचार संहितेचा संबंध नसून प्रशासनाने तत्काळ कर्मचारी व अधिकाऱ्याना वेतन द्यावे, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने पाऊल उचलून दिवाळीपूर्वी प्रश्न न सोडवल्यास कर्मचारी संघर्ष करतील, असा इशाराही श्रीरंग बरगे यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिला.

आणखी वाचा-शेखर शेंडेंना काँग्रेसकडून उमेदवारी; पण शरद पवार गटाने व्यक्त केली ‘ही’ शक्यता

नेमके झाले काय?

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महामंडळ व प्रशासनाकडे दिवाळी बोनस आणि दिवाळीपूर्वी वेतनाची मागणी केली जात आहे. परंतु शासनाने आचारसंहितेपूर्वी तातडीने निर्णय घेतला नाही. आचार संहिता लागण्याच्या काही तासापूर्वी निर्णय झाल्यावर आदेश निर्गमित व्हायला थोडा विलंब झाल्याने हे सर्व प्रश्न उपस्थित झाले. आता कर्मचारी आणि कर्मचारी संघटना संतापली असल्याने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि वेतन मिळणार काय? याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid paying salary to st employees before diwali citing code of conduct mnb 82 mrj