* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
* भेदभाव असेपर्यंत आरक्षणाची ग्वाही; विरोधकांची सरकारवर टीका
देशात सहिष्णू-असहिष्णू हा वाद असू शकत नाही, तो तसा कधी नव्हता. भंडारा जिल्ह्य़ात खैरलांजी हत्याकांड झाले तेव्हा कुणीच कसे पुरस्कार परत केले नाहीत? केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर हा वाद उरकून काढण्यात आला, असा विरोधकांवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या निवडणुकीनंतर पुरस्कार वापसी मोहीम बंद झाली, याकडे लक्ष वधले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विधानसभेत डॉ. आंबेडकर आणि राज्यघटना यावर चर्चा आयोजित करण्यात आली. चर्चेला सुरुवात करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात असहिष्णू वातावरण वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असहिष्णुतेमुळे हिंदू धर्माचा त्याग केला होता, असे नमूद केले. चर्चेचा समारोप करताना मुख्यमंत्र्यांनी चव्हाण यांच्या विधानाचा समाचार घेतला. आम्हाला सहिष्णुता शिकवण्याची आवश्यकता नाही. आमच्या रक्तात सहिष्णुता आहे. हा देश सहिष्णू लोकांचा आहे. राज्यघटनेचा मूलभूत ढाचा कुणीही बदलू शकत नाही. संसददेखील त्यात बदल करू शकत नाही. कारण, घटना समितीने संसद निर्माण केली आहे. यावर केशवानंद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा केला आहे.
डॉ. आंबेडकरांनी देशातील सामाजिक परिस्थिती बघून आरक्षणाची तत्त्वे राज्यघटनेत समाविष्ट केली आहेत. ते वैज्ञानिक तत्त्व आहे. मागासलेल्यांना समान पातळीवर आणण्यासाठी हे आरक्षण देण्यात आले आहे. त्या संधीची समानता निर्माण झाली आहे. अजूनही समाजातील मोठा वर्ग वंचित आहे. जोपर्यंत समाजातील एकही व्यक्ती भेदभावाने ग्रस्त असेल तोपर्यंत सामाजिक आरक्षण सुरू राहील, असेही फडणवीस म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने डॉ. आंबेडकर यांची १२५ वी जयंती राष्ट्रीय बंधुत्व समरसता दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. समरसता म्हणजे, मानवी स्वातंत्र्याची आहुती देण्याची संकल्पना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा सरकार राबवू पाहत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. त्या मुद्यांवर मुख्यमंत्री चांगलेच भडकल्याचे दिसून आले. त्यांनी शब्दाचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. समरसता या शब्दांचा पहिल्यांदा वापर माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी केला. जातपात, धर्मविरहित समाज आणि राष्ट्रवाद, असा शब्दाचा अर्थ आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
माजी मंत्री छगन भुजबळ, वर्षां गायकवाड, मंत्री राजकुमार बडोले, बच्चू कडू, तसेच इतर सदस्य चर्चेत सहभागी झाले होते.