वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांना त्यातील धोका जाणवून देणे व प्रभावी जनजागृतीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवला. त्यात यमराजाच्या वेशभूषेतील कलावंत वर्दळीच्या रस्त्यांवर उपस्थित राहून वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यात आले. हा उपक्रम लक्षवेधी ठरला.
हेही वाचा- यवतमाळ : रस्ता देता का रस्ता?, चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याचे शेतात उपोषण
दरम्यान, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत १२ हजार १२८ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. त्यानुसार वेगमर्यादेचे पालन न करणारे, तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध २ कोटी ४३ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच मोर्शी-वरूड-पांढुर्णा, दर्यापूर-खोलापूर-येवदा, दर्यापूर-अंजनगाव-परतवाडा, मोर्शी-चांदूर बाजार-परतवाडा या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील हे अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी जिल्हा वाहतूक शाखेने इंटरसेप्टर वाहनासह पथके तैनात केली आहेत, असे बारगळ यांनी सांगितले.
त्याचबरोबर, बहुरूपी कलावंताची मदत घेऊन जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यात यमराजाच्या वेशभूषेतील कलावंत महत्त्वाचे रस्ते, वर्दळीचे चौक, बाजारपेठा, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट व सीटबेल्टच्या वापराबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.