नागपूर : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिका आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत एखाद्या नगराचे किंवा भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरिकांचा कोणताही समूह यात सहभागी होऊ शकतो, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक मोहल्ला या भागात २०० पेक्षा कमी आणि ५०० पेक्षा जास्त घरे नसावी. मोहल्ल्यातील प्रतिनिधींनी ८३८०००२०२५ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरून किंवा ‘ऑनलाईन लिंक’च्या माध्यमातून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करू शकतात किंवा ऑफलाईन माध्यमातून, महापालिकेच्या झोन कार्यालयात छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. झोन कार्यालयातून आवश्यकतेनुसार अधिक माहिती आणि मदत मिळू शकेल.
हेही वाचा >>> इंडियन सायंन्स कॉंग्रेसमध्ये आज काय-काय? टीना अंबानी येणार, कृषी विज्ञानावरही मंथन
मोहल्ल्यातील एका परिसरातील किमान दहा कुटुंबांची संबंधित अर्जावर स्वाक्षरी असणे किंवा स्पर्धेतील सहभागाला त्यांचा पाठिंबा असणे, आवश्यक आहे. ही स्पर्धा ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज प्राप्त होताच, मोहल्ल्याचे मूल्यांकन करण्यात येईल. या माध्यमातून मोहल्ल्याचे निर्धारित मापदंडांनुसार मूल्यांकन होईल. शहरातील नामांकित वर्तमानपत्रांच्या संपादकांच्या मार्गदर्शनात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या चमूमार्फत मोहल्ल्याचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेचा अंतिम निर्णय एप्रिल २०२३ मध्ये जाहीर करण्यात येईल.
हेही वाचा >>> हुश्श…! एकाचा बळी अन् अनेकांवर हल्ले करणारा वाघ अखेर जेरबंद
बक्षिसांचे स्वरूप
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्यातून मोहल्ल्यामध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांसाठी तीन मोहल्ल्यांची निवड केली जाईल. तिनही मोहल्ल्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये असे एकूण ७५ लाख रुपये बक्षीस मिळेल. दुसऱ्या क्रमांकासाठी ५ मोहल्ल्यांची निवड केली जाईल व त्यांना प्रत्येकी १० लाख असे एकूण ५० लाख रुपये बक्षीस मिळेल. तृतीय पुरस्कार ७ मोहल्ल्यांना प्रदान केला जाईल. यामध्ये प्रत्येकी ५ लाख असे एकूण ३५ लाख रुपये पुरस्कार असेल.