लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : ज्या लोकांनी अजूनही अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतलेले नाही त्यांनी १९ एप्रिलला मतदान झाल्यावर दर्शनाला यावे. मला आधीच सूचना द्यावी. अयोध्येत तुमची सर्व व्यवस्था असेल, अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागपूरकर मतदारांना साद घातली. नागपूर लोकसभेचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पश्चिम नागपूर परिसरात सोमवारी आयोजित जनसभेला ते संबोधित करीत होते.

आदित्यनाथ म्हणाले, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विविध भागांमध्ये सभा घेताना एक ठळकपणे जाणवतेय की, ज्यांनी रामाला आणले त्यांनाच सत्तेत आणण्याचा निर्धार जनतेने केला आहे. मोदींच्या नेतृत्वात ५०० वर्षांचा वनवास संपून राम मंदिर उभे राहिले. याआधी प्रत्येक होळीला ‘होली खेले रघुवीरा अवध मे…’ हे गाणे वाजत होते. मात्र, यावर्षी पहिल्यांदा रामलल्ला खऱ्या अर्थाने अयोध्येत होळी खेळले. हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण असून मोदी सरकारच हे करू शकते, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. आतापर्यंत किती लोकांनी अयोध्येचे दर्शन केले असा प्रश्न विचारत योगींनी आवाहन केले की, ज्यांनी अजूनही दर्शन घेतले नाही त्यांनी मोठ्या संख्येने १९ एप्रिलला मतदान करावे, त्यानंतर अयोध्या दर्शनाला यावे. सर्व व्यवस्था केली जाईल.

आणखी वाचा-रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

या सभेला नितीन गडकरी, माजी आमदार सुधाकर देशमुख, परिणय फुके, माजी महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आदींची उपस्थिती होती. नितीन गडकरी यांनीही मतदारांना संबोधित केले.

गडकरी अजातशत्रू

गडकरींनी केवळ नागपुरात नाही तर संपूर्ण देशात पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. त्यांच्याकडे ‘नाही’ हा शब्दच नाही. प्रत्येक राज्यांना त्यांनी कोट्यवधींचा निधी देऊन कामे केली. राजकारणात गडकरींविषयी कुणीही नकारात्मक बोलत नाही. गडकरी हे राजकारणातले अजातशत्रू आहेत. नागपूरकरांना असे खासदार मिळणे ही नशिबाची गोष्ट असल्याचेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya darshan lured by yogi adityanath claims to make all arrangements for the visitors dag 87 mrj