नागपुरात पाच वर्षांत शंभरावर केंद्रांची सुरुवात
नागपूर : शारीरिक वजन कमी करण्यासह विविध आजारांवर उपचारासाठी आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी केंद्राचा आधार शोधणाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत अनेक पटींनी वाढली आहे. जिल्ह्य़ात या काळात शंभरावर नवीन केंद्रांची भर पडली असून केरळच्या धर्तीवर नागपूरही आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी केंद्रांचे हब म्हणून विकसित होताना दिसत आहे.
खानपानाच्या वाईट सवयी, व्यायामाचा अभाव, बैठय़ा जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, एकूण लोकसंख्येच्या ३० ते ४० टक्के नागरिकांमध्ये लठ्ठपणा आढळतो. शारीरिक वजन वाढल्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाबासह इतरही आजारांचा धोका वाढतो. एकदा यातील एकाही आजाराची लागण झाल्यास आयुष्यभर औषध घ्यावी लागते. हे टाळण्यासाठी अनेक नागपूरकर आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी केंद्रांमध्ये ३, ७, १४, २८ दिवसांपर्यंत राहून नैसर्गिक पद्धतीने उपचार घेत आहेत. या केंद्रामध्ये योगा, प्राणायाम, विविध आहार, आयुर्वेद औषध, पंचकर्म करवून घेतले जाते. विविध औषधयुक्त तेलांनी मालिश केली जाते. पाच वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्य़ात पाच ते दहा आयुर्वेद उपचार केंद्रे होती. नागरिकांची वाढणारी गर्दी बघता आता ही संख्या १२५ च्या घरात पोहोचली आहे.
अशी असते उपचार पद्धती
आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी केंद्रांमध्ये स्थूल व्यक्तीचे वजन कमी करण्यासाठी औषधयुक्त तेलांची मसाज, शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पावडरची मसाज, लेखन वस्ती (इनेमा), विविध प्रक्रियेतून ओकारी करवून घेणे, विविध आयुर्वेदिक पदार्थ खाऊ घालणे, औषधयुक्त पाण्याची डोक्याच्या खालच्या भागाला वाफ देणे, अॅक्युप्रेशरच्या मदतीने शरीराचे विशिष्ट पॉईंट दाबून उपचार करणे, योगा, प्राणायाम करण्यावर जास्त भर दिला जातो.
अप्रशिक्षित व्यक्तींकडून उपचार धोकादायक
नागपूर जिल्ह्य़ातील काही केंद्रांमध्ये कोणताही आयुर्वेद अभ्यासक्रम न करणाऱ्या व्यक्तींकडूनही उपचार केले जात असल्याचे खुद्द या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. कुणावर चुकीचे उपचार झाल्यास त्वचा लोंबकाळणे, खरडणे, पाठीचे दुखणे वाढणे, अशक्तपणासह इतरही आजार संभवतात. यामुळे शरीराचे नुकसान होते.
परिजातक आयुर्वेद केंद्राचे निरीक्षण
परिजातक आयुर्वेद केंद्राकडे पाच वर्षांपूर्वी आठवडय़ाला दोन ते तीन रुग्ण उपचारासाठी यायचे, परंतु हल्ली त्यात वाढ होऊन ही संख्या २०वर पोहोचली आहे. या केंद्रात येणाऱ्यांपैकी ६० टक्के व्यक्ती हे लठ्ठपणाची समस्या घेऊन येतात. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसह पाठीच्या मणके, हात-पायाचे दुखणे, मायग्रेन आदी रुग्णांचा समावेश असतो.
आयुर्वेद उपचार पद्धतीवर नागरिकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्ह्य़ात शंभरावर केंद्र वाढली असून त्यात उपचार घेणाऱ्यांची संख्याही पाचहून जास्त पटींनी वाढली आहे, परंतु केंद्रात प्रशिक्षित व्यक्तींकडूनच उपचार गरजेचा असून चुकीच्या उपचाराने संबंधित व्यक्तीला हाणीही होऊ शकते.
– नीतेश खोंडे, आयुर्वेद तज्ज्ञ